सडपातळ महिलांना फटीतून ‘एक्साईज’च्या गोदामात पाठवलं, वर्ध्यात दारुच्या 202 पेट्या चोरीला

| Updated on: Apr 17, 2020 | 2:52 PM

पोलिसांनी एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष आणखी सखोल चौकशी केली, तेव्हा चार नव्हे, तब्बल 202 पेट्या दारु चोरट्यांनी चोरल्याचं उघड झालं आहे.(Wardha Excise Department Liquor Theft)

सडपातळ महिलांना फटीतून एक्साईजच्या गोदामात पाठवलं, वर्ध्यात दारुच्या 202 पेट्या चोरीला
Follow us on

वर्धा : दारुबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात एक्साईज विभागाने जप्त केलेल्या मालाच्या गोदामातून तळीरामांनी चार पेट्या चोरुन नेल्याची घटना सहा दिवसांपूर्वी समोर आली होती. मात्र फक्त चार नव्हे, तर तब्बल 202 पेट्या चोरीला गेल्याचं आता उघड झालं आहे. धक्कादायक म्हणजे गोदामाच्या दरवाजाला असणाऱ्या फटीतून सडपातळ महिलांना आत पाठवून हे चौर्यकर्म करण्यात आलं. (Wardha Excise Department Liquor Theft)

वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असल्यामुळे ‘दारुबंदी विभाग’ कार्यरत आहे. जप्त केलेली दारु गोदामात जमा करायचा, हा उत्पादन शुल्क विभागाचा नित्यक्रम आहे. त्यानुसार दारुचा मोठा साठा या विभागाच्या गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला होता. पण चार दिवसांपूर्वी गोदामामधून दारुचा माल चोरीला गेल्याची घटना समोर आली. चार पेट्या चोरीला गेल्याचं समोर आलं होतं.

पोलिसांनी या प्रकरणात एक्साईज विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष आणखी सखोल चौकशी केली, तेव्हा या प्रकरणात मोठी माहिती समोर आली. चार नव्हे, तर तब्बल 202 पेट्या दारु चोरट्यांनी चोरुन नेली आहे.

गोदामाच्या दरवाजाला असणारी फट या चोरीसाठी चोरट्यांच्या कामी आली. या फटीमधून आत शिरणाऱ्या सडपातळ महिला ही चोरी करण्यासाठी निवडण्यात आल्या. महिला आत शिरायच्या आणि दरवाजातून पेट्या बाहेर काढायच्या. बाहेर असणाऱ्या पुरुषांनी त्या मालाची विल्हेवाट लावायची असा नित्यक्रम सुरु होता.

लॉकडाऊनच्या काळात या चोरट्यांचा डाव यशस्वी ठरत होता. पण पोलिसांच्या लक्षात येताच ही मोठी चोरी समोर आली. आधी चार पेट्या चोरीला गेल्या असे सांगणारे एक्साईज डिपार्टमेंट अखेर सखोल चौकशीत अचंबित झाले. 202 पेट्या लंपास करणाऱ्या चार महिला आणि चार पुरुषांना अटक करण्यात आली आहे.

लॉकडाऊनमुळे सगळीकडे रस्ते बंद करण्यात आले आहेत. अशातच तळीरामांनी आपली हौस पूर्ण होत नसल्याने हा मार्ग निवडला. अटक केलेले आरोपी हे स्वत: अवैध दारु विक्रेते असल्याचं तपासात समोर आलं आहे. मात्र यात या महिलांनी वर्धेच्या रामनगर येथील एका दारु विक्रेत्याच्या सांगण्यावरुन हा पराक्रम केल्याची चर्चा आहे.

(Wardha Excise Department Liquor Theft)