वर्ध्यात पोलिसांना पाहताच पोहणारे कपडे सोडून पळाले, गाड्या जप्त; 15 जणांवर कारवाई

| Updated on: Apr 12, 2020 | 8:15 PM

वर्ध्यात नियम मोडत नदीत पोहणाऱ्या 15 नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई केली (Wardha Police action against swimming people).

वर्ध्यात पोलिसांना पाहताच पोहणारे कपडे सोडून पळाले, गाड्या जप्त; 15 जणांवर कारवाई
Follow us on

वर्धा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे मॉर्निंग वॉक आणि स्विमिंगसारख्या गोष्टींवर देखील निर्बंध आहेत. मात्र, काही नागरिकांकडून या नियमांचं उल्लंघन होत असल्याने वर्धा पोलिसांनी आज (12 एप्रिल) अशा लोकांवर थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. सेवाग्राम येथे मॉर्निंग वॉकला निघालेल्या 29 नागरिकांवर कारवाई करण्यात आली. तसेच नियम मोडत नदीत पोहणाऱ्या 15 नागरिकांवरही पोलिसांनी कारवाई केली (Wardha Police action against swimming people). पोलिस कारवाईमुळे पोहणाऱ्यांना आपले कपडे नदीच्या काठावरच सोडून पळ काढण्याची नामुष्की आली. नदीत पोहणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत त्यांच्या 6 गाड्या हिंगणघाट पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

हिंगणघाट येथे नियमभंग करत नदीत पोहणाऱ्यांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर जात कारवाई केली. यावेळी पोलिसांना पाहून नदीत पोहणाऱ्यांना आपले कपडे सोडून तसाच पळ काढावा लागला. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत पोहणाऱ्यांचे कपडे ताब्यात घेतले. हे पाहताच पोहणारे नदीच्या दुसऱ्या काठाकडून उघडेच पळाले. यानंतर पोलिसांनी नदी किनाऱ्यावर उभ्या असणाऱ्या या पोहणाऱ्यांच्या 6 गाड्या जप्त केल्या आहेत.

वर्धा पोलिस प्रशासनाने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचा धडाकाच चालवला आहे. रविवारी (12 एप्रिल) सेवाग्राम येथे अशा 29 जणांवर कारवाई करत 500 रुपयांप्रमाणे 14 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. दुसरीकडे हिंगणघाट येथेही वणा नदीवर पोहणाऱ्या 15 जणांवर कारवाई करण्यात आली. पोलिसांनी स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नदीत पोहणाऱ्यांवर थेट कारवाई केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराच्या बाहेर निघू नका असा इशारा दिला आहे. असं असलं तरी काही नागरिक बाहेर पडत आहे. काही जण तर काम नसताना केवळ मजा म्हणून पोहण्यासाठी नदीत जात आहेत.

अखेर पोलिस प्रशासनाने बेशिस्त नागरिकांवर कारवाईचं सत्र सुरु केलं आहे. यात पोलिसांना नगर परिषदेचे कर्मचाऱ्यांचही सहकार्य मिळत आहे. असं असलं तरी कोरोनाचा धोका असताना नागरिकांकडून होणाऱ्या या बेजबाबदार वर्तनुकीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Wardha Police action against swimming people