अंगणात वडिलांचे पार्थिव असतानाही धीराने संस्कृतचा पेपर दिला, शंभरपैकी शंभर गुण

| Updated on: Jul 31, 2020 | 11:10 AM

आपल्या 'बा'चे पार्थिव घरात असताना नेमका त्याच दिवशी सानिकाचा संस्कृत विषयाचा पेपर होता. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली.

अंगणात वडिलांचे पार्थिव असतानाही धीराने संस्कृतचा पेपर दिला, शंभरपैकी शंभर गुण
Follow us on

यवतमाळ : अंगणात वडिलांचे पार्थिव असतानाही यवतमाळच्या धीरोदात्त लेकीने दहावीची परीक्षा पूर्ण दिली. अंत्यसंस्काराच्या दिवशी असलेल्या संस्कृतच्या पेपरमध्ये सानिका पवारला शंभरपैकी शंभर गुण मिळाले. दहावी एसएससी परीक्षेत 97. 60 टक्के गुण मिळवणाऱ्या सानिकाचे कौतुक होत आहे. (Yavatmal SSC Student Sanika Pawar scored out of marks in Sanskrit)

यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील पवार कुटुंबावर काळाने घात केला. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या सुधाकर पवार यांनी विहिरीत उडी घेत स्वतःची जीवनरेषा पुसून टाकली. सहा मार्च रोजी घडलेल्या या घटनेने परिवाराच्या काळजावर आभाळभर दुःखाचं गाठोडं येऊन पडलं.

अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या साहित्याची जुळवाजुळव करण्यासाठी लगबग सुरु होती. याच वेळी लाडाची लेक सानिकाने आभाळ चिरत जाईल असा हंबरडा फोडला आणि क्षणार्धात शांतता पसरली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

बोट धरुन चालायला शिकवणारा, आपल्या अंगा खांद्यावर खेळवणारा बाप तिच्याजवळ नव्हता. बापासाठी अंगणात तिरडी बांधत असल्याचे बघून सानिकाचे डोळे डबडबले. भविष्याचा वेध घेणारी दहावीची परीक्षा सुरु होती. आपल्या ‘बा’चे पार्थिव घरात असताना नेमका त्याच दिवशी सानिकाचा संस्कृत विषयाचा पेपर होता. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली.

सूर्य जसजसा पुढे सरकू लागला, तशी तिची तगमग वाढली. सानिकाने डबडबलेल्या डोळ्यातील अश्रू मायच्या साडीच्या पदराने पुसत स्वतःला सावरले, अन् तडक परीक्षा केंद्राच्या दिशेने ती यवतमाळकडे निघाली. तिने दोन-चार तास मागे वळून बघितलेच नाही.

नुकत्य जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात सानिकाला संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले. इंग्रजीत 91, मराठीत 96. या यशाने हिवरी गावाच्या शिरावर मानाचा तुरा खोवला आहे.

सानिका जायंटस् इंग्लिश मिडीयम स्कूल यवतमाळची विद्यार्थिनी नव्हे, तर वाघीण असल्याचे तिचे शिक्षक सांगतात. तिने आभाळासोबत स्पर्धा करणारे यश अगदी प्रतिकूल परिस्थितीत मिळवले खरे, पण पाठीवर कौतुकाची थाप मारण्यासाठी बाप नाही याचे शल्य तिला सारखे बोचत आहे.

काबाडकष्ट करुन मुलीला शिकवायचे, मुलीला डॉक्टर करायचे, असे स्वप्न तिच्या वडिलांनी बघितले होते. ते ती पूर्ण करणार. आज बाबा असते तर गावभर आनंदात सांगत फिरले असते, असे सानिका साश्रू नयनांनी सांगते.

नापिकीमुळे सुधाकर पवार यांनी आत्महत्या केली. दुःखातून सावरुन घेत लेकीने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.त्यामुळेच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सानिकाला पुढील शिक्षणासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

संबंधित बातम्या

एकाच शाळेत, एकाच वर्गात, दहावीत गुणही सेम टू सेम, कोल्हापूरच्या जुळ्या भावांची अनोखी यशोगाथा

नातींकडून प्रोत्साहन, इचलकरंजीचे आजोबा दहावी उत्तीर्ण, वयापेक्षा अधिक टक्के

टॅब न दिल्याने आत्महत्या केलेल्या शेतकरीपुत्राला दहावीत 81 टक्के, निकाल ऐकून माऊलीने हंबरडा फोडला

SSC Result 2020 | बीडच्या पठ्ठ्याची कमाल, दहावीत सर्वच्या सर्व विषयात 35 गुण!

(Yavatmal SSC Student Sanika Pawar scored out of marks in Sanskrit)