Hair Care Tips: केसांच्या समस्यांनी हैराण? करा आवळ्याचा उपयोग, जाणून घ्या फायदे

| Updated on: Jul 19, 2022 | 6:57 PM

अनेक जण केसांच्या समस्येमुळे हैराण होतात. त्यापासून वाचायचे असेल तर रोज आवळ्याचा उपयोग करा. त्यामुळे तुमचे केस मजबूत आणि घनदाट होतील.

Hair Care Tips: केसांच्या समस्यांनी हैराण? करा आवळ्याचा उपयोग, जाणून घ्या फायदे
Follow us on

धावपळीच्या, व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याचे नुकसान होत आहे. कामाचे वाढते तास, अपुरा आहार, बाहेरचं खाणं, प्रदूषण,अपुरी झोप, मोबाईल- लॅपटॉपचा वाढता वापर या सर्वांचा आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम असतो. त्यामुळे केसांच्याही विविध समस्या सहन कराव्या लागतात. केसगळती, कोरडे, दुभंगलेले केस, केसांचा दाटपणा कमी होणे, वेळेपूर्वीच केस पांढरे होणे असे अनेक त्रास सहन (Hair Problem) करावे लागतात. पोटातून योग्य आहार घेणे आणि केसांची योग्य काळजी (Hair care)घेणे, पुरेशी झोप घेणे तसेच घरगुती उपायांनी केसांचे आरोग्य वाढवता येते. केसांसाठी आवळा अतिशय उपयोगी ठरतो. आवळ्यामध्ये (Amla) खूप पोषक तत्वे असतात. त्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते, ज्यामुळे तुमचे केस मजबूत, घनदाट आणि चमकदार होण्यास मदत मिळते. खाण्यातून तसेच हेअर मास्कच्या माध्यमातून तुम्ही केसांसाठी आवळा वापरू शकता.

यूव्ही किरणांपासून बचाव

हानिकारक यूव्ही किरणांपासून चेहरा वाचवण्यासाठी आपण सनस्क्रीन वापरतो. त्याचप्रमाणे सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केसांचेही खूप नुकसान होते. त्यावेळी तुम्ही आवळ्यापासून बनलेला हेअर मास्क लावून केसांचे होणारे नुकसान कमी करू शकतात. प्रदूषण, धूळ, माती, हानिकारक यूव्ही किरणे, यामुळे केसांचा पोत बिघडतो, ते कोरडे आणि पातळ होतात. मात्र आवळ्याचा हेअर मास्क लावल्यास या सर्वांपासून रक्षण होते. त्यातील कॅल्शियममुळे केसांचे पोषण होते. केस घनदाट होतात, लांबी वाढते व त्यांचा पोतही सुधारतो.

केस पांढरे होणे थांबवते

वाढत्या प्रदूषणामुळे, अयोग्य आहारशैलीमुळे अनेकांचे केस वेळेआधीच पांढरे होतात. ते थांबवायचे असेल तर आवळ्याचा उपयोग करा. आवळ्यात कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन ए, सी आणि ई यासारखी पोषक तत्वे आहेत. त्याचे सेवन केल्यास केसांसाठी फायदेशीर ठरते. त्यांचे पोषण तर होतेच पण त्यांचा नैसर्गिक रंग कायम राखण्यासही मदत होते.

कोंडा दूर करतो

कोंड्यामुळे आपले केस कोरडे आणि निर्जीव होतात. तसेच मोठ्या प्रमाणात गळतातही. आवळ्याचे सेवन अथवा त्याचा हेअर मास्क वापरल्यास खूप फायदा होतो. आवळ्यामध्ये ॲंटी-बॅक्टेरियल आणि ॲंटी- इन्फ्लेमेटरी गुण असतात. ज्यामुळे केसातील कोंडा कमी होतो. आवळ्यातील व्हिटॅमिन सी मुळे केसांना पोषण मिळते व त्यांचा कोरडेपणाही कमी होतो. टाळूवर रॅशेस किंवा खाज सुटण्यापासूनही आवळा बचाव करतो.

केसांची लांबी वाढण्यास होते मदत

आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. त्याचे सेवन केले किंवा हेअर मास्कच्या माध्यमातून त्याचा उपयोग केल्यास केसांना पोषण मिळते. त्यामुळे केसांची लांबी वाढते, ते घनदाट होतात. आवळ्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो. त्याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर दिसून येतो व ते वाढण्यास मदत होते.