
आयुर्वेदात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. मग त्या दिनचर्येबद्दल असो किंवा मग आहाराबद्दल. आरोग्याबाबत, आहाराबाबत बरेच नियम आयुर्वेदात सांगण्यात आले आहेत तसेच आजारांवरचे अनेक उपायही सांगण्यात आले आहेत. कारण आयुर्वेद ही केवळ एक वैद्यकीय व्यवस्था नाही, तर ती एक जीवनशैली आहे.आयुर्वेदातील तत्त्वे पाळल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होऊ शकते. दरम्यान आयुर्वेदात आरोग्याच्या दृष्टीने अनेक गोष्टींना मनाई करण्यात आली आहे. मात्र तरी देखील कळत-नकळत आपल्यापैकी बहुतेक जण दररोज याच गोष्टींचा आचरण करत असतात. त्या कोणत्या गोष्टी आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात.
आयुर्वेदात ही काम निषिद्ध मानली आहेत
जेवणानंतर थंड पाणी पिणे
जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्याने अग्नि म्हणजेच पचनक्रिया मंदावते, चयापचय मंदावते आणि आतड्यांमधील चरबी कडक होते. अनेक आधुनिक अभ्यासातून असेही दिसून आले आहे की यामुळे एंजाइमची क्रिया मंदावते आणि पोषक तत्वांचे शोषण कमी होते. आणि ते शरीरालाही मिळत नाही.
नाश्ता न करणे किंवा थंड अन्न न खाणे
नाश्ता हा दिवसातील सर्वात महत्वाचा भाग मानला जातो. तो शरीराला दिवसभरासाठी ऊर्जा प्रदान करतो. तसेच, तुमचा नाश्ता तसेच जेवणही थंड नसावे ते बऱ्यापैकी गरम असणे आवश्यक आहे. आयुर्वेदानुसार, सकाळ हा “कफ” चा काळ आहे, म्हणून उबदार आणि हलका आहार घेणे महत्त्वाचे असते. पण आपण बऱ्याचदा सकाळी कामानिमित्त जाताना नाश्ता एक तर टाळतो किंवा गरम खाण्यात वेळ जाईल म्हणून थंड करून खातो. त्यामुळे त्याचे फायदे जसे मिळायला हवे तसे मिळत नाही.
उशिरा झोपणे आणि उशिरा उठणे
आयुर्वेदानुसार, सकाळी उठण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे ब्रह्ममुहूर्त (सूर्योदयापूर्वी). यामुळे हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते आणि मानसिक स्पष्टता मिळते. रात्री उशिरापर्यंत जागणे तुमच्या आरोग्यासाठी खूप वाईट मानले जाते.
सूर्यास्तानंतर फोनचा जास्त वापर
सूर्यास्तानंतर, तुम्ही तुमचा फोन किंवा टीव्ही सारख्या गोष्टींपासून दूर राहावे. या उपकरणांमधून निघणारा निळा प्रकाश झोपेच्या संप्रेरकाला (मेलॅटोनिन) व्यत्यय आणतो. आयुर्वेदिक भाषेत याला पित्त वाढणे म्हणतात. आणि आजकाल सगळेच झोपण्याच्या आधी देखील मोबाईल पाहत किंवा टीव्ही पाहत झोपतात. त्यामुळे झोप तर होतच नाही शिवाय त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो.
जेवणासोबत किंवा जेवणानंतर फळे खाणे टाळावे
जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच फळे खाल्ल्याने पोटात अमा (विषारी पदार्थ) आणि किण्वन होऊ शकते. पोषणतज्ञ असेही म्हणतात की फळांमधील साखरेचे पचन जलद होते, जे जड पदार्थांसोबत मिसळल्यास आम्लता आणि पोटफुगी होऊ शकते. त्यामुळे कधीही जेवणासोबत किंवा जेवणानंतर लगेच फळे खाणे टाळावे.
जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणे
जेवणानंतर लगेच आंघोळ केल्याने पचनक्रिया बिघडू शकते. आयुर्वेदानुसार, जेवणानंतर कमीत कमी दोन तास आंघोळ करण्यापूर्वी थांबावे.
उभे राहून पाणी पिणे
उभे राहून पाणी पिल्याने मूत्रपिंडाच्या गाळण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय येतो आणि नसांवर दबाव येतो. म्हणूनच, आयुर्वेद नेहमी आरामात बसून आणि हळूहळू पाणी पिण्याचा सल्ला देतो. पण कामाच्या धावपळीत अनेकजण हा देखील नियम पाळत नाही.
फळे, मीठ आणि मासे यांच्यासोबत दूध खाणे
दूध, फळे, मीठ आणि मासे हे “अन्नविरोधी” मानले जातात. त्यांचे एकत्र सेवन केल्याने त्वचेचे विकार, ऍलर्जी आणि आतड्यांमध्ये असंतुलन निर्माण होऊ शकते. आधुनिक विज्ञान असेही सुचवते की हे पदार्थ प्रथिनांचे शोषण बिघडवतात.
दुःखी, रागावलेले किंवा फोनवर बोलताना जेवणे
जर तुम्ही दुःखी मनाने, रागाने किंवा फोनवर बोलत असताना जेवत असाल तर तुमची पचनशक्ती मंदावते. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते आणि विविध पचन समस्या देखील उद्भवू शकतात.
हवामानाप्रमाणे बदलत नाही
ऋतूंवर आधारित आयुर्वेद नेहमीच बदलत्या ऋतूनुसार आहार, जीवनशैली आणि झोपेच्या पद्धती जुळवून घेण्यावर भर देतो. आधुनिक विज्ञान देखील याला पुष्टी देते.