Heart Attack: हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक

थंडीचा हंगाम सुरू झाला की हार्ट अटॅकची प्रकरणं वारंवार वाढतात. डॉ. अजीत जैन यांच्याकडून जाणून घेऊया की तापमान कमी झाल्यावर हार्ट अटॅकचा धोका का वाढतो? तसेच कोणती लक्षणे दिसतात.

Heart Attack: हिवाळ्यात ही लक्षणे दिसली तर सावध व्हा! येऊ शकतो हार्ट अटॅक
Winter heart attack
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 21, 2025 | 6:04 PM

थंडी सुरू होताच तापमान झपाट्याने खाली येते आणि याचा थेट परिणाम हृदयावर होतो. अशा वेळी आधीपासून हृदयरोग असलेले रुग्ण, वृद्ध, डायबिटीजचे रुग्ण आणि उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकचा धोका जास्त वाढतो. म्हणून थंडीत हृदयाच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. हिवाळ्यात थंडीत हृदयाशी संबंधित अगदी छोटे लक्षणही दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. आता ही लक्षणे कोणती? जाणून घ्या…

सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा जडपणा, जो डाव्या हातात, खांद्यात किंवा पाठीत पसरणारा असतो. याशिवाय श्वास घेण्यास त्रास होणे, सतत धाप लागणे, हलके चक्कर येणे, अतिशय थकवा आणि घाम येणे हेही धोक्याची लक्षणे आहेत. काहींना जबडा किंवा मान दुखणेही जाणवते. थंडीत अनेकदा लोक ही लक्षणे गॅस, अशक्तपणा किंवा साधा थकवा समजून दुर्लक्ष करतात. ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. चालताना, जिना चढताना किंवा थंडीत बाहेर जाताना छातीत दुखणे वाढले तर तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळीच ओळख आणि उपचाराने हार्ट अटॅकचा गंभीर धोका बराच कमी करता येतो.

थंडीत हार्ट अटॅकची प्रकरणं वाढण्याची ४ मोठी कारणे कोणती?

१. रक्तवाहिन्यांचे आकुंचन होणे

राजीव गांधी हॉस्पिटलच्या कार्डिओलॉजी विभागातील डॉ. अजीत जैन सांगतात की थंडीमुळे आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. यामुळे हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हार्ट अटॅकची शक्यता वाढते.

२. रक्त घट्ट होणे

थंडीत शरीराचे तापमान कमी झाल्यावर रक्त किंचित घट्ट होते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते, जे हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचे कारण बनू शकते.

३. ऑक्सिजनची कमतरता

थंडीत शरीर गरम ठेवण्यासाठी हृदय जास्त मेहनत घेते. यामुळे हृदयाला लागणारा ऑक्सिजन वाढतो आणि कमकुवत हृदय असलेल्या व्यक्तींमध्ये धोका जास्त होतो.

४. अचानक मेहनत किंवा व्यायाम

थंडीत वॉर्म-अप न करता जोरदार काम किंवा व्यायाम केल्यास हृदयावर अचानक ताण पडतो, ज्यामुळे ठोका अनियमित होऊ शकतो आणि अटॅकची स्थिती निर्माण होऊ शकते.

कसे करावे बचाव?

-शरीर नेहमी गरम ठेवा आणि अचानक थंड वातावरणात जाऊ नका.

-रक्तदाब, साखर आणि कोलेस्ट्रॉलची नियमित तपासणी करा.

-वॉर्म-अप न करता जोरदार व्यायाम किंबा काम करू नका.

-धूम्रपान सोडा आणि निरोगी आहार घ्या.

-छातीत दुखणे, श्वास लागणे किंवा अतिशय थकवा जाणवला तर तात्काळ डॉक्टरांना भेटा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)