
पावसाळा सुरू झाला की निसर्गरम्य वातावरणासोबत काही समस्याही येतात, ज्यापैकी एक समस्या म्हणजे डोक्यात उवा होणे. उवा होणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी पावसाळ्यात ओलावा आणि आर्द्रतेमुळे ही समस्या वाढू शकते. अनेकदा एकमेकांचा कंगवा वापरल्याने उवांचा संसर्ग वाढतो. तसेच बाजारातील केमिकलयुक्त शॅम्पूमुळे केसांचे नुकसान होते. पण पावसाळ्यात उवांचा त्रास का होतो आणि त्यावर तुम्ही कोणते सोपे आणि घरगुती कोणते उपाय करु शकता, हे आपण जाणून घेणार आहोत. यामुळे तुमच्या केसांचे आरोग्यही जपले जाईल. तसेच उवांचा त्रासही कमी करतील.
पावसाळ्यातील वातावरण उवांच्या वाढीसाठी अनुकूल असते. पावसाळी वातावरणात खूप ओलावा असतो. या दिवसात केस लवकर सुकत नाहीत. त्यामुळे ते ओलसर किंवा दमट राहतात. ओलावा आणि केसांमधील घाण यामुळे उवांची वाढ झपाट्याने होते. ओल्या केसांत उवांची अंडी म्हणजेच ज्यांना आपण लिखा म्हणतो, त्यांची वाढ लवकर होते. कालांतराने या लिखांमुळे डोक्यातील उवांची संख्या वाढते.
अनेकदा लोक एकमेकांचे टॉवेल किंवा कंगवा वापरतो. मात्र यामुळे एका व्यक्तीच्या डोक्यातील उवा दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याची शक्यता असते. त्यामुळे कोणाचेही टॉवेल किंवा कंगवा वापरु नका. तसेच उवा काढण्यासाठी बाजारात मिळणारे शॅम्पू किंवा लोशन अजिबात वापरु नका. त्यात काही रसायने असू शकतात. ज्यामुळे केसांना नुकसान होऊ शकते. यामुळे नैसर्गिक आणि घरगुती उपाय वापरणे अधिक फायदेशीर ठरते. उवांचा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय तुम्ही करु शकता.
उवांचा त्रास कमी करण्यासाठी उपाय 2 कांदे, कडुलिंबाची पाने, 4 कापूर वड्या आणि खोबरेल तेल या वस्तू घ्या. प्रथम कांदा किसून किंवा वाटून त्याचा रस काढून घ्या. यानंतर हा रस कापडाने किंवा चाळणीने गाळून घ्या. त्यानंतर हा रस थेट केसांच्या मुळाशी लावावा. जर लहान मुलांच्या केसांना लावायचा असेल, तर तो खोबरेल तेलात मिसळून वापरावा. रस लावल्यावर 15 मिनिटे डोके कपड्याने झाकून ठेवा. यानंतर शॅम्पूने केस धुवा. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल.
कडुलिंबाची पाने
यासोबतच उवा कमी करण्यासाठी कडुलिंबाची पानेही उपयुक्त पडतात. कडुलिंबाच्या पानांमध्ये जंतूनाशक गुणधर्म असतात, जे उवांना मारण्यास मदत करतात. कडुलिंबाची पाने स्वच्छ धुवून घ्या आणि ती पाण्यात उकळा. पाणी थंड झाल्यावर ती पानं काढून टाका. ज्यामुळे पानांमधील पोषक तत्वे पाण्यात उतरतील. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरा. केस धुतल्यावर हे पाणी संपूर्ण केसांवर चांगले शिंपडा. यानंतर 20 मिनिटांनी केस साध्या पाण्याने धुवा. यामुळे केसांना नैसर्गिक चमक तर येते, शिवाय उवाही कमी होतात.
कापूर आणि खोबरेल तेल
कापूर आणि खोबरेल तेल हा सर्वात सोपा उपाय आहे. हा उपाय केसांना मऊ ठेवतो. तसेच उवा काढण्यास मदत करतो. एका पॅनमध्ये खोबरेल तेल गरम करा. गॅसची मंद आचेवर ठेवून त्यात कापूर वड्या टाका. जेव्हा तेल आणि कापूर यांच्या मिश्रणातून धूर निघायला लागेल, तेव्हा पॅन झाकून ठेवा. धूर बाहेर जाऊ देऊ नका. मिश्रण थंड झाल्यावर केसांवर लावा. 15 मिनिटांनी केस शॅम्पूने धुवा. यामुळे तुमच्या डोक्यातील उवा नाहीशा होतील.
या घरगुती उपायांनी तुम्ही केसांना नुकसान न पोहोचवता उवांच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. हे उपाय नियमित वापरल्यास केस निरोगी राहतील आणि डोक्यातील खाज कमी होईल.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)