वडापावपासून इडलीपर्यंत… तुमच्या आवडत्या नाश्त्यामध्ये नेमक्या किती कॅलरीज? आकडा पाहून डोळे फिरतील!

भारतीय नाश्त्याच्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात? समोसा, वडा पाव, कचोरी आणि इडली यांपैकी आरोग्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे, हे जाणून घ्या या बातमीमध्ये.

वडापावपासून इडलीपर्यंत... तुमच्या आवडत्या नाश्त्यामध्ये नेमक्या किती कॅलरीज? आकडा पाहून डोळे फिरतील!
indian breakfast
| Updated on: May 20, 2026 | 2:15 PM

भारतीय लोक हे प्रचंड खवय्ये असतात. त्यांना खाण्याची प्रचंड आवड असते. सकाळचा नाश्ता असो वा संध्याकाळचा चहा… भारतीयांना दररोज काहीतरी चटपटीत आणि मसालेदार खाण्याची इच्छा होते. सकाळी गरमागरम इडली, संध्याकाळी मसालेदार कचोरी, पाऊस सुरु झाला की समोसे, भजी यावर प्रत्येक भारतीय ताव मारताना दिसतो. प्रत्येक राज्य आणि शहराचा स्वतःचा एक वेगळा आवडता नाश्ता आहे. पण आजकाल फिटनेस आणि आरोग्याबद्दल वाढत्या जागरूकतेमुळे, लोक स्वत:च्या आहाराकडे अधिक लक्ष देत आहेत.

आपण दररोज खात असलेल्या पदार्थांमधून आपल्या शरीराला किती ऊर्जा (कॅलरीज) मिळते, त्याचा आपल्या वजनावर व आरोग्यावर काय परिणाम होतो, याबद्दल सध्या लोक जागरुक होऊन समजून घेत आहेत. आज आपण आपल्या आवडत्या स्ट्रीट फूड आणि नाश्त्याच्या पदार्थांमध्ये किती कॅलरीज असतात, याचे गणित जाणून घेऊया.

१. समोसा

भारतात समोसा प्रचंड लोकप्रिय आहे. गल्लीबोळातील प्रत्येक दुकानात मिळणारा हा मसालेदार, बटाटा भरलेला समोसा खरोखरच चविष्ट असतो. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, एका साधारण बटाट्याच्या समोसामध्ये २५० ते ३०० कॅलरीज असतात. समोसामध्ये भरल्या जाणाऱ्या सारणानुसार हे प्रमाण कमी-जास्त होऊ शकते.

२. वडा पाव

मुंबईकरांचा जीव की प्राण असलेला वडा पाव आता देशभरातील इतर शहरांमध्येही तितकाच लोकप्रिय झाला आहे. पावाच्या मध्यभागी बटाट्याचा तळलेला वडा, सोबत चटणी आणि तळलेली मिरची अशा पद्धतीने चवीने हा वडापाव खाल्ला जातो. चवीला उत्तम असणाऱ्या एका वडापावमधून शरीराला तब्बल ३०० ते ३५० कॅलरीज मिळतात.

३. पकोडे किंवा भजी 

भारतात भजी खूप आवडीने खाल्ले जातात, विशेषतः पावसाळ्यात चहा आणि भजीची जुगलबंदी अप्रतिम ठरते. बटाटे, पालक, पनीर आणि कांदे अशा विविध घटकांपासून भजी बनवल्या जातात. त्यामुळे त्यातील घटकांनुसार कॅलरीज बदलतात. तरीही, ४ ते ५ कांदा भजी खाल्ल्यास शरीरात अंदाजे २०० ते ३०० कॅलरीज जातात.

४. कचोरी

कुरकुरीत आणि डाळीचे चटपटीत सारण भरलेली कचोरी अनेकदा बटाट्याच्या रस्सा भाजीसोबत खाल्ली जाते. चवीला छान असली तरी ती तेलात खोल तळलेली असल्याने तिचे जास्त सेवन केल्यास पोटाचे विकार होऊ शकतात. एका कचोरीमध्ये साधारणपणे १८० ते २५० कॅलरीज असतात.

जर तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि तरीही बाहेरच्या चवीचा आनंद घ्यायचा असेल, तर खालील पर्याय उत्तम मानले जातात:

ढोकळा (Dhokla): गोड, आंबट आणि तिखट चवीचा ढोकळा हा खायला अतिशय हलका असतो. वाफेवर शिजवला जात असल्यामुळे हा एक आरोग्यदायी पर्याय आहे. तुम्ही सहज दोन ते तीन ढोकळे खाल्ले, तरी त्यातून केवळ १५० ते १८० कॅलरीज मिळतात.

इडली (Idly): सर्वात कमी कॅलरी असलेला आणि आरोग्यासाठी सर्वोत्तम नाश्ता म्हणजे इडली-सांबार. सांबार आणि चटणीसोबत खाल्ली जाणारी इडली पचनास उत्तम असते. एका इडलीमध्ये अवघ्या ४० ते ५० कॅलरीज असतात, ज्यामुळे फिटनेस प्रेमींसाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरतो. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा आवडता नाश्ता निवडाल, तेव्हा चवीसोबतच कॅलरीजचा हा हिशोब नक्की लक्षात ठेवा.

Follow Us