बिअर प्यायल्याने पोट सुटतं? हा गैरसमज आधी दूर करा; मग दोष चकण्याचा की आणखी कुणाचा?

Beer and belly fat: बिअर प्यायल्याने पोट सुटतं, असा अनेकांचा समज आहे. मात्र, वजन वाढण्यामागे केवळ बिअरच कारणीभूत नसते, काय असतात मग कारणं?

बिअर प्यायल्याने पोट सुटतं? हा गैरसमज आधी दूर करा; मग दोष चकण्याचा की आणखी कुणाचा?
Beer Belly
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 12:01 AM

बिअर प्यायल्याने पोट सुटतं, असा अनेकांचा समज आहे. त्यामुळे बिअर पिणाऱ्यांना अनेकदा त्यांच्या वाढलेल्या पोटावरून टोमणेही ऐकावे लागतात. मात्र, बिअरमुळेच पोट सुटतं का? यामागे आणखी काही कारणं आहेत का? याबाबत एका फिटनेस तज्ज्ञाने महत्त्वाची माहिती दिली आहे. बिअरपेक्षा त्यासोबत खाल्ला जाणारा चकणा आणि व्यायामाचा अभाव यांचाही वजन वाढण्याशी संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बिअरपेक्षा चकण्याकडे लक्ष द्या

फिटनेस तज्ज्ञांच्या माहितीनुसार, बिअरच्या एका कॅनमध्ये साधारण 180 ते 200 कॅलरीज असतात. तर मोठ्या बॉटलमधून जवळपास 370 ते 480 कॅलरीज शरीरात जातात. त्यामुळे बिअरमध्ये कॅलरीज असतात, हे नक्कीच खरं आहे. मात्र, वजन वाढण्यामागे केवळ बिअरच कारणीभूत असते, असं म्हणता येणार नाही.

Loading...

बिअर पिताना अनेक जण चकली, तेलकट पदार्थ, पिझ्झा किंवा फ्राईज असे पदार्थ खातात. या पदार्थांमधून शरीरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कॅलरीज जातात. त्यामुळे बिअरसोबत नेमकं काय खाल्लं जातं, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.

अल्कोहोलमुळे पचनक्रियेवरही परिणाम

अल्कोहोलचं सेवन केल्यानंतर पचनसंस्थेच्या कामावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बिअरमधील कॅलरीजसोबतच चकण्यामधून मिळणाऱ्या अतिरिक्त कॅलरीजचाही विचार करावा लागतो. त्यातच नियमित व्यायाम नसेल तर वजन वाढण्याची शक्यता अधिक असते.

त्यामुळे बिअर प्यायल्यानेच पोट सुटतं, असा निष्कर्ष काढण्याआधी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. थोडक्यात, वजन वाढण्यामागे बिअरसोबत खाल्ला जाणारा चकणा आणि शारीरिक हालचालींचा अभाव हीदेखील महत्त्वाची कारणं असू शकतात.

मग बिअर पिताना काय काळजी घ्यावी?

बिअरचं सेवन करताना त्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थांचं प्रमाण आणि प्रकार याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. सतत तेलकट, तळलेले आणि जास्त कॅलरीज असलेले पदार्थ खाणं टाळायला हवं. त्याचबरोबर नियमित व्यायाम, चालणं आणि संतुलित आहार यांनाही महत्त्व द्यायला हवं. अर्थात, अल्कोहोलचं सेवन आरोग्यासाठी सुरक्षित मानता येत नाही. त्यामुळे केवळ चकणा बदलल्याने बिअरचे आरोग्यावरील दुष्परिणाम टळतात, असं नाही.

(टीप- मद्यप्रशान हे आरोग्यास हानिकारक आहे. मद्यप्राशन करू नये. मद्य पिण्याची सवय लागली असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. व्यसनमुक्ती केंद्रांची मदत घ्यावी. )

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us