24 वर्षांचं क्रिकेट, प्रचंड प्रसिद्धी अन् तरीही शांतता कशात शोधतात सचिन? रणवीर सिंहसोबतच्या संवादात सांगितलं मनातलं गुपित
Sachin Tendulkar Opens Up About His Life Beyond Cricket: रणवीर सिंहच्या प्रश्नांना सचिन तेंडुलकर यांनी दिलखुलास उत्तरं दिली आहे. त्यांची मुलाखत चर्चेत आली आहे.

क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने कोट्यवधी चाहत्यांना आनंद देणारे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा एक वेगळाच पैलू नुकताच पाहायला मिळाला. अभिनेता रणवीर सिंह आणि सचिन तेंडुलकर यांच्यात रंगलेल्या दिलखुलास संवादातून क्रिकेट, आयुष्य, कुटुंब, प्रेरणा आणि सामाजिक कार्य अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. Global Peace Honors अंतर्गत आयोजित 26/11 श्रद्धांजली कार्यक्रमात ही खास मुलाखत पार पडली.
या मुलाखतीत रणवीर सिंहने विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना सचिन यांनी मिश्किल, भावनिक आणि विचार करायला लावणारी उत्तरं दिली. रणवीर सिंहने सचिन यांना एक रंजक प्रश्न विचारला. तुम्हाला एक दिवसासाठी दुसरी व्यक्ती बनण्याची संधी मिळाली, तर तुम्ही कोण बनाल? या प्रश्नावर सचिन यांनी क्षणाचाही विलंब न करता पॉपस्टार मायकल जॅक्सन यांचं नाव घेतलं.
मायकल जॅक्सन यांचा डान्स आणि त्यांचं अप्रतिम फूटवर्क यांचं आपल्याला नेहमीच आकर्षण वाटत असल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिकेटच्या मैदानावर पायांच्या हालचालींनी गोलंदाजांना उत्तर देणाऱ्या सचिन यांना मायकल जॅक्सनच्या डान्समधील फूटवर्क विशेष भावत असल्याचं या उत्तरातून दिसलं. सचिन यांच्या आयुष्यातील प्रेरणास्थान कोण, असा प्रश्न रणवीर यांनी विचारला. यावर सचिन यांनी आपल्या वडिलांची आठवण सांगितली.
आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतात. कुटुंबाची जबाबदारी, आर्थिक मर्यादा आणि प्रतिकूल परिस्थिती असतानाही शांत राहून मार्ग काढण्याची वृत्ती त्यांनी वडिलांकडून शिकल्याचं सांगितलं. शांतता, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन हीच वडिलांकडून मिळालेली सर्वात मोठी शिकवण असल्याचं सचिन यांनी स्पष्ट केलं.
24 वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीनंतर आता शांतता आणि आनंद कशात शोधता, असा प्रश्नही रणवीर यांनी विचारला. यावर सचिन यांनी स्वतःला एक साधा माणूस असल्याचं सांगितलं. मित्र आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालवणं, एकत्र बसून गप्पा मारणं आणि जुन्या आठवणींना उजाळा देणं यातच त्यांना खरा आनंद मिळतो. आनंदासाठी एखादं खास ठिकाण असण्यापेक्षा चांगली माणसं आणि त्यांचा सहवास अधिक महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
रणवीर सिंह याच्या एका प्रश्नावर मुलाखतीत हास्याचे फवारेही उडाले. अभिनेता क्रिकेटपटू आणि क्रिकेटपटू अभिनेता यांच्याबद्दलच्या चर्चेत सचिन यांनी कपिल देव यांचा उल्लेख केला. 1983 च्या विश्वचषक विजयाच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला. याशिवाय हरभजन सिंह, श्रीसंत आणि इरफान पठाण यांनी चित्रपटांमध्ये केलेल्या कामाचाही उल्लेख झाला. क्रिकेटच्या मैदानावरील काही मजेशीर प्रसंगांवर दोघांमध्ये हलकेफुलके संवाद रंगले.
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही सचिन यांचं भारतासाठी योगदान देण्याचं काम सुरू आहे. त्यांच्या सामाजिक कार्यातून मुलांना शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. मुलांचं भविष्य घडवणं आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध करून देणं हीच त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगची दिशा असल्याचं या संवादातून अधोरेखित झालं.
मुलाखतीच्या शेवटी रणवीर सिंहने सचिन यांच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल आणि देशाला दिलेल्या आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच सचिन यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक मुलांच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या नव्या संधी आणि आशेचंही कौतुक केलं. क्रिकेटमधील विक्रमांपलीकडे जाऊन माणूस म्हणून सचिन यांची विचारसरणी आणि सामाजिक बांधिलकी या मुलाखतीतून समोर आली.
