
आपल्यापैकी अनेक लोक अंडे खाल्ल्यानंतर त्याची साल लगेच कचरापेटीत फेकून देतात. आपल्याला वाटतं की ही साल निरुपयोगी आहे, पण खरं तर तसं नाही. ही साधारण दिसणारी अंड्याची साल एक प्रकारचा नैसर्गिक खजिना आहे, जी आपल्या आरोग्यापासून ते घरातील अनेक कामांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकते. यात कॅल्शियम कार्बोनेटचे प्रमाण भरपूर असते. याशिवाय, बोरोन, मॅग्नेशियम, कॉपर, आयर्न, सल्फर, आणि झिंक यांसारखी अनेक महत्त्वाची पोषक तत्वेही त्यात आढळतात.
एका अहवालानुसार, अंड्याच्या सालांमध्ये 90% पेक्षा जास्त कॅल्शियम कार्बोनेट असते, जे मानवी शरीरातील हाडे आणि दातांसाठी खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच, अंड्याची साल फेकून देण्याऐवजी त्याचा योग्य वापर कसा करायचा, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
त्वचेसाठी: अंड्याच्या सालीची बारीक पूड करून ती दही किंवा मधात मिसळा. या मिश्रणाचा चेहऱ्यावर स्क्रब केल्यास त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि त्वचा अधिक चमकदार दिसते. नियमित वापराने चेहऱ्यावरील सुरकुत्याही कमी होऊ शकतात.
केसांसाठी: अंड्याच्या सालीची पूड दह्यात मिसळून केसांच्या मुळांवर लावा आणि २० मिनिटांनी केस धुवा. यामुळे केसांना नैसर्गिक चमक येते.
पिवळे दात: एक चमचा अंड्याच्या सालाची पूड, चिमूटभर बेकिंग सोडा आणि थोडे नारळाचे तेल एकत्र करून पेस्ट बनवा. या पेस्टने दात घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि ते पांढरे दिसतात.
नखांसाठी: अंड्याच्या सालाची पूड नेलपॉलिशमध्ये मिसळून लावल्यास नखे मजबूत होतात.
भांडी घासण्यासाठी: जळलेली किंवा जास्त घाण झालेली भांडी स्वच्छ करण्यासाठी अंड्याच्या सालीचा उपयोग होतो. अंड्याच्या सालीची पूड जाडसर वाटून ती भांड्यांवर घासल्यास भांडी स्वच्छ होतात आणि चमकतात.
सिंकची सफाई: स्वयंपाकघरातील सिंकमध्ये अडकलेली घाण काढण्यासाठी अंड्याची साल वापरता येते. सालाची पूड सिंकमध्ये टाकून त्यावर गरम पाणी ओतल्यास सिंकमधील घाण सहज निघून जाते.
झाडांसाठी खत: अंड्याच्या सालांमध्ये कॅल्शियम असल्याने ती झाडांसाठी उत्तम नैसर्गिक खत म्हणून काम करतात. सालांची पूड कुंडीतील मातीत मिसळल्यास मातीची गुणवत्ता सुधारते आणि झाडांची वाढ चांगली होते. तसेच, ही पूड स्लग्स आणि स्नेल्ससारख्या किड्यांना झाडांपासून दूर ठेवते.
या सोप्या आणि प्रभावी उपायांनी तुम्ही अंड्याच्या सालांचा योग्य वापर करू शकता आणि कचरा कमी करून पर्यावरणाची मदतही करू शकता.