
फॅशनमध्ये स्टायलिश आणि ट्रेंडी दिसण्याची हौस आज प्रत्येकालाच असते. नवीन डिझाईनचे कपडे, महागड्या ड्रेसिंग ब्रँड्स, आणि सेलिब्रिटींसारखा लुक – हे सगळं अनेकजण करतात. पण फक्त महागडे कपडे घालणं म्हणजेच स्टाईल असं नाही. खरं स्टाईलिंग म्हणजे पॉवर ड्रेसिंग. ही अशी फॅशन स्टाईल आहे जी तुमच्या कॉन्फिडन्सला, बॉडी लँग्वेजला आणि व्यक्तिमत्त्वाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाते.
बॉलिवूडच्या स्टाइल आयकॉन दीपिका पादुकोण आणि सोनम कपूरसारखे लूक पाहिले असतीलच, त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या पोशाखातून जाणवतो. तेच आहे पॉवर ड्रेसिंगचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य कपडे बोलतात, पण व्यक्तिमत्त्व अधिक बोलकं दिसतं.
पॉवर ड्रेसिंग ही केवळ ऑफिससाठी मर्यादित नसून ही एक युनिव्हर्सल स्टाईल आहे. आपण ही ड्रेसिंग प्रोफेशनल मिटिंग्स, कॅज्युअल गेट-टुगेदर, ट्रॅव्हल किंवा इव्हेंटसाठी करू शकतो.
या ड्रेसिंगमध्ये कपड्यांची रचना (structure), त्याचे कट्स आणि रंग यांना खूप महत्त्व आहे. ब्लेझर, को-ऑर्ड सेट्स, टेलर्ड ट्राऊझर्स, आणि सॉलिड रंग हे पॉवर ड्रेसिंगचे मुख्य घटक आहेत. उदाहरणार्थ, गडद निळा, मॅरून, ब्राऊन, ग्रीन यासारख्या मोनोक्रोम रंगांचे पोशाख अधिक आकर्षक वाटतात.
केवळ कपडे स्टायलिश असले तरी बाकी लूक सुसंगत नसेल तर प्रभाव कमी होतो. त्यामुळे योग्य मेकअप आणि हेअरस्टाईलचा समावेश महत्त्वाचा आहे. पॉवर ड्रेसिंगमध्ये सटल आणि न्यूड मेकअप लूक अधिक योग्य ठरतो. केस खुले न ठेवता पोनीटेल किंवा लो बन सारखे क्लासिक हेअरस्टाईल निवडा.
या ड्रेसिंग प्रकारात ‘कमीत कमी, पण दमदार’ हा फॉर्म्युला वापरला जातो. त्यामुळे हेवी ज्वेलरी टाळावी आणि फक्त एक स्टायलिश घड्याळ, बारीक चैन, साधे स्टड्स आणि स्लीम बेल्ट इतपत ऍक्सेसरीज घालाव्या. फुटवेअरमध्ये ब्लॉक हील्स, लोफर्स, किंवा पंप्स योग्य ठरतात.
पॉवर ड्रेसिंग ही फक्त वेस्टर्न कपड्यापुरती मर्यादित नाही. भारतीय साडीमध्येही पॉवरफुल लुक सहज उभा राहू शकतो. सिल्क, खादी, कॉटन सिल्क किंवा लिननच्या साड्यांना हाई नेक किंवा कॉलर ब्लाउजची साथ दिल्यास लूक अधिक क्लासी दिसतो. यासोबत ब्लेझर किंवा बेल्ट घालून पॉवर ड्रेसिंगचा परिपूर्ण भारतीय अवतार तयार करता येतो.
तुमच्या पोशाखातून तुमचा आत्मविश्वास जाणवला पाहिजे. यासाठी ब्रँडेड कपडे असण्याची गरज नाही, पण त्यांचं फिटिंग, रंगसंगती आणि स्टाइलिंग व्यवस्थित असणं गरजेचं आहे.
आजच्या काळात पॉवर ड्रेसिंग ही केवळ फॅशन नाही, तर व्यक्तिमत्त्व घडवण्याची एक ‘थेरपी’ बनली आहे. त्यामुळे आपणही सोनम कपूर किंवा दीपिकासारखं स्टाईल स्टेटमेंट तयार करू शकतो फक्त गरज आहे ती योग्य स्टाइल निवडण्याची आणि आत्मविश्वासाने ती सादर करण्याची.