कब्रस्तानात रीलबाजी ! व्हिडीओ बनवत कबरींवरील नावांची थट्टा… कुठे घडला प्रकार ?
बुलढाणा शहरातील एका मुस्लिम कब्रस्तानमध्ये दोन तरुणांनी कबरींची थट्टा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये दोन तरूण हे कबरींवर लिहिलेली नावे वाचताना आणि त्यांची थट्टा करताना दिसले. यामुळे संतापाचं वातावरण असून अनेक लोक मोठ्या संख्येने लोक पोलिस ठाण्यात जमले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

बुलढाणा येथे धार्मिक भावना दुखावल्याचा एक प्रकार समोर आला आहे. मलकापूर रोडवरील मुस्लिम कब्रस्तानमध्ये शूट करण्यात आलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि परिसरात तणाव निर्माण झाला. या व्हिडिओमध्ये, दोन तरुण दिसत असून ते कबरींमधून फिरताना, सेल्फी काढताना आणि कबरींवरील नावे वाचत, त्यावरून विनोद करताना दिसले. एवढंच नव्हे तर शेवटी त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली असाही आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ 19 वर्षीय अनुज रिसोडकर आणि ओम फाटे यांनी तयार केला आहे. त्यांनी तो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. “कब्रिस्तान फनी वीडियो” अशा कॅप्शनसह त्यांनी तो पोस्ट केला होता. पाहता पाहता हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने पसरला आणि प्रचंड व्हायरल झाला. आणि याची माहिती मुस्लिम समुदायातील लोकांपर्यंतही पोहोचली. मात्र या व्हिडिओबद्दल समाजात तीव्र संताप दिसून आला.
ही बाब उघडकीस येताच, मस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती स्टेशन प्रभारी रवी राठोड यांना दिली. या व्हिडिओद्वारे स्मशानभूमीसारखं ठिकाण अपवित्र करण्यात आलं आणि धार्मिक भावना दुखावल्या असा आरोप लोकांनी केला.
दोघांना अटक
संवेदनशील परिस्थिती ओळखून पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. हा व्हिडीओ बनवणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटवून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. चौकशी केल्यानंतर, त्यांच्याविरुद्ध संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट करण्याच्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली जाते आणि कायद्यानुसार कारवाई केली जाईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. सध्या दोन्ही आरोपी पोलिस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
