मेथी दाण्यापासून बनवलेले घरगुती हेअर मास्क वापरा अन् सुंदर-घनदाट केस मिळवा
मेथी आणि कढीपत्ता हे केसांसाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे सुंदर आणि घनदाट केसांसाठी घरगुती उपाय काय चांगले असतात. मार्केटमध्ये मिळणाऱ्या महाग प्रोडक्ट्समुळे आपले केस काही दिवस छान वाटतात मात्र यामुळे केसांचं मोठं नुकसान होतं.

मुंबई : सुंदर, घनदाट आणि लांब केसांसाठी बाजारात अनेक महाग प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. पार्लरमध्ये अनेक केमिकलयुक्त प्रोडक्ट्सपासून ट्रिटमेंट केल्या जातात. मात्र यामुळे केसाची पोत खराब होते आणि नैसर्गिक चमक नाहीशी होते. त्यामुळे अनेकांना केसांच्या समस्या आहेत. निस्तेज, केस गळणे, कोंडा आणि केस विरळ होण्याची समस्या स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सर्वांना आहेत. त्यामुळे या महाग प्रोडक्ट्सला विसरा आणि हे घरगुती उपाय करुन बघा. मेथी (Methi), कांद्याचा रस (Onion Juice) आणि कढीपत्ता (Curry Leaves) हे केसांच्या पोषणासाठी सर्वात उत्तम आहेत. त्यामुळे या नैसर्गिक साधनांचा वापर करून आपल्या केसांची निगा राखा. मेथी आणि कढीपत्त्यापासून तयार केलेला मास्क तर उपयोगी पडतो. आज आम्ही तुम्हाला मेथीपासून तयार करण्यात येणारे घरगुती हेअर मास्क (Hair Pack) सांगणार आहोत.
घरच्या घरी तयार करा हेअर मास्क
मेथी आणि कढीपत्ता
कढीपत्ता आणि मेथीचा हेअर मास्क तयार करण्यासाठी मूठभर मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्यांना बारीक वाटून घ्या. मूठभर ताजा कढीपत्ताही मिक्सरमधून वाटून घ्या. नंतर या दोन्ही पेस्ट एकत्र करा. हा मास्क टाळूला आणि केसांना लावा आणि अर्धा तासाने थंड पाण्याने स्वच्छ धुवा. हा हेअर मास्क आठवड्यातून एक किंवा दोनचा वापरा.
मेथी आणि तिळाचं तेल
हा हेअर मास्क बनविताना एका भांड्यात 5 टेबलस्पून तिळाचं तेल, 2 टेबलस्पून मेथीचे दाणे आणि मूठभर पुदिना घ्या. हे सर्व एकत्र गरम करा. मेथी आणि पुदिन्याचा रंग बदलला की हे तेल गॅसवरुन खाली उतरवा आणि थंड करा. हे तेल एका बॉटलमध्ये गाळून भरुन ठेवा. या तेलाने रात्री झोपताना टाळूला मसाज करा. या तेलाने आठवड्यातून एकदा मसाज करा.
मेथी आणि लिंबू
3 टेबलस्पून मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मेथी दाण्याची पेस्ट बनवा आणि त्यात 4 टेबलस्पून लिंबाचा रस मिक्स करा. ही पेस्ट टाळूला 45 मिनिटं लावून ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. हा हेअर मास्कचा आठवड्यातून एकदा वापर करा.
मेथी आणि दही
एक वाटी दहीत दोन चमचे मेथी दाणे रात्रभर भिजवा आणि सकाळी मिक्सरमधून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट टाळू आणि केसांना 30 मिनिटं लावू ठेवा. हा मास्क आठवड्यातून एक किंवा दोन वेळा लावा.
मेथी आणि कोरफड
दोन चमचे कोरफड जेल, दोन चमचे मेथी दाण्याची पेस्ट आणि 1 चमचा मध एकत्र करा. तासाभरासाठी हा मास्क केसांवर लावून ठेवा. आणि सौम्य शॅम्पूने तो धुवून टाका.
मेथी आणि तांदुळ
एका काचेच्या बॉटलमध्ये 5 चमचे तांदूळ घ्या आणि 3 चमचे मेथीचे दाणे भिजत घाला. सकाळी याची पेस्ट बनवून घ्या. ज्या पाण्यात ते भिजवले असतात ते पाणीही तुम्ही स्प्रे म्हणून केसांना लावू शकता. त्याचाही केसांना खूप फायदा होतो. ही पेस्ट एक तास केसांना लावा. आणि थंड पाण्याने धुवा.
टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
संबंधित बातम्या