
2026 मध्ये भारतात तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे दरम्यान देशातील अनेक भागात सामान्यपेक्षा जास्त तापमानाचा इशारा दिला आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच कोणते उपायांचा अवलंब केला पहिजे ते जाणून घेऊयात.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
जेव्हा एखाद्या भागात तापमान अनेक दिवस सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त राहते तेव्हा उष्णतेची लाट निर्माण होते. जर यासोबत उच्च आर्द्रता असेल तर उष्णतेचे परिणाम आणखी धोकादायक ठरते. शास्त्रज्ञांच्या मते हवामान बदलामुळे जगभरातील उष्णतेच्या लाटा लांब आणि तीव्र होत आहेत.
कोणत्या लोकांना उष्णतेचा जास्त धोका आहे?
उष्णतेच्या लाटांचा परिणाम सर्वांना होतो. पण उष्णतेच्या लाटांचा परिणाम हा जास्त करून नवजात बाळं आणि लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध आणि दीर्घकालीन आजाराने ग्रस्त असलेले लोक यांना होतो. कारण लहान मुलांचे शरीर प्रौढांपेक्षा उष्णता सहन करण्यास कमी सक्षम असते, त्यामुळे ते सहजपणे डिहाइड्रेट होऊ शकतात. गर्भवती महिलांमध्ये अति उष्णतेमुळे डिहाइड्रेशन, वेळे आधीच प्रसूती आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी महत्वाचे उपाय
पुरेसे पाणी प्या: उन्हाळ्यात दिवसभर नियमितपणे पाणी पिणे अत्यंत महत्वाचे आहे. मुलांना वारंवार पाणी पिण्यास प्रोत्साहित करा.
दुपारच्या कडक उन्हापासून दूर राहा: दुपारी बाहेर जाणे टाळा, विशेषतः सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत. जर तुम्हाला बाहेर जायचेच असेल तर सावलीच्या ठिकाणी विश्रांती घ्या.
तुमचे घर थंड ठेवा: उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाश रोखण्यासाठी घरतील खिडक्या किंवा पडदे दुपारी बंद ठेवा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघडा जेणेकरून थंड हवा आत येऊ शकेल. पंखा किंवा कुलर देखील तापमान कमी करण्यास मदत करू शकते.
हलके आणि सैल कपडे घाला: उन्हाळ्यात कॉटनचे हलके कपडे घालणे चांगले. यामुळे शरीर थंड राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो.
उन्हाळ्यात बाहेर जाताना ही काळजी घ्या
सनस्क्रीन लावणे.
टोपी किंवा छत्री वापर करणे.
अधूनमधून सावलीत थांबा.
हिट स्ट्रेसमुळे ही विविध लक्षणे उद्भवू शकतात-
जास्त घाम येणे
चक्कर येणे किंवा अशक्तपणा
डोकेदुखी
मळमळ किंवा उलट्या
स्नायू पेटके
जर एखाद्या व्यक्तीला चक्कर येणे, गोंधळलेली दिसणे, शरीराचे उच्च तापमान किंवा झटके येणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे.
एखाद्याला उष्णतेचा ताण आला तर काय करावे?
त्या व्यक्तीला थंड सावलीच्या ठिकाणी बसवा.
अंगावर थंड पाणी किंवा ओले कपडा ठेवा.
पाणी किंवा ओआरएस द्या.
जर तुम्हाला गंभीर लक्षणे आढळली तर ताबडतोब रुग्णालयात जा.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)