Skin Care Tips: हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा टाळायचा आहे? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत करा ‘हे’ उपाय
Winter Skin Care Routine: हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि खरखरीत दिसू लागते. अशा वेळी सकाळपासून रात्रीपर्यंत त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी कोणते स्किन केअर रुटीन फॉलो करावे, जाणून घ्या.

थंडीच्या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. परिणामी त्वचा कोरडी, खरखरीत आणि निस्तेज दिसू लागते. अनेकदा चेहरा, हात आणि पायांवर काळेपणा, पांढरे डाग किंवा ड्राय पॅचेसही दिसतात. अशा वेळी दिवसभर वारंवार मॉइश्चरायझर लावूनही त्वचेचा कोरडेपणा कमी होत नाही. त्यामुळे केवळ दिवसा त्वचेची काळजी घेणे पुरेसे नसून, रात्री झोपण्यापूर्वीही योग्य स्किन केअर रुटीन फॉलो करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी त्वचेला योग्य मॉइश्चरायझेशन आणि पोषण मिळाल्यास सकाळी त्वचा अधिक मऊ, मुलायम आणि तजेलदार दिसण्यास मदत होऊ शकते. तसेच हिवाळ्यात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्वचेची योग्य काळजी घ्यावी लागते. चला तर जाणून घ्या हिवाळ्यात स्किन केअर रूटीनमध्ये कोणत्या गोष्टी कराव्या.
ग्लिसरीन आणि गुलाबजल
हिवाळ्यात त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ग्लिसरीन आणि गुलाबजलचा वापर करू शकता. यासाठी एका स्वच्छ बाटलीत अर्धे ग्लिसरीन आणि उरलेल्या भागात गुलाबजल घालून चांगले मिसळा. हे मिश्रण रोज रात्री झोपण्यापूर्वी चेहरा, हात आणि पायांवर लावा. ग्लिसरीन त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मऊ राहण्यास मदत होऊ शकते.
बदामाचे तेल
बदामाचे तेल त्वचेला मॉइश्चरायझ करण्यासाठी उपयुक्त ठरते. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब हातावर घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. नियमित वापरामुळे त्वचा मऊ आणि चमकदार दिसू शकते.
गरम पाण्याचा वापर टाळा
हिवाळ्यात गरम पाण्याने आंघोळ करणे अनेकांना आवडते. मात्र, खूप गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल कमी करू शकते. त्यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन पॅचेस दिसू लागतात. म्हणून चेहरा धुण्यासाठी आणि आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
डेड स्किन काढून टाका
त्वचेवर मृत पेशी जमा झाल्यामुळे त्वचा निस्तेज दिसू शकते. यासाठी पिठाच्या कोंड्यात थोडे दही मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहरा, मान, हात आणि पायांवर हलक्या हाताने लावा. काही वेळाने पाण्याने धुऊन टाका. मात्र, त्वचेवर जोरात घासणे टाळा. संवेदनशील त्वचा असल्यास हा उपाय करण्याआधी पॅच टेस्ट करा.
साबणाचा वापर टाळा
हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढत असल्यास तीव्र सुगंध असलेले किंवा जास्त कोरडेपणा निर्माण करणारे साबण वापरणे टाळा. त्याऐवजी सौम्य क्लिन्झर किंवा मॉइश्चरायझिंग बॉडी वॉश वापरा. यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होईल. आंघोळीनंतर त्वचा थोडी ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावल्यास अधिक फायदा होऊ शकतो.