Ashok Saraf: अशोक सराफ यांच्या सिनेमाने दिली बॉलिवूडला टक्कर, पहिल्याच आठवड्यात कमावले इतके कोटी
Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा ‘आदि अनंत’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

सध्या बॉक्स ऑफिसवर हिंदी चित्रपटांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. या चित्रपटांच्या गर्दीमध्ये मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांच्या ‘आदि अनंत’ चित्रपटाने डोकं वर काढले आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप उमटवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. आता पहिल्या आठवड्यात चित्रपटाने किती कमाई केली? वाचा…
‘आदि अनंत’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या पहिल्याच आठवड्यात चित्रपटाने तब्बल २.१६ कोटी रुपयांची कमाई केली असून महाराष्ट्रात १ लाख २५ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री केली आहे. ही विक्रमी घोडदौड अद्याप सुरूच आहे. प्रेक्षकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता चित्रपटाच्या शोमध्येही वाढ करण्यात आली आहे.
२५० हून अधिक शो
विशेष म्हणजे, पाच मराठी चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘आदि अनंत’ने दुसऱ्या आठवड्यात दिमाखात प्रवेश केला आहे. सध्या महाराष्ट्रातील सुमारे २०० चित्रपटगृहांत २५० हून अधिक शोसह चित्रपटाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील सातत्यपूर्ण कामगिरी यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण टीममध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
आजोबा आणि नातवाच्या नात्यातील भावनिक बंध, त्यांच्यातील मतभेद, संवाद, प्रेम आणि एकमेकांसाठी असलेली ओढ या सगळ्याची हृदयस्पर्शी मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या अभिनयातील सहजता, त्यांच्यातील सुंदर केमिस्ट्री आणि भावनिक प्रसंगांची प्रभावी मांडणी प्रेक्षकांना विशेष भावत आहे. केवळ मनोरंजन न करता नात्यांकडे नव्याने पाहण्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आपलीशी वाटणारी कथा अनुभवायला देत आहे.
व्हायरल व्हिडीओने वेधले होते लक्ष
अशोक सराफ हे कायम त्यांच्या साधेपणामुळे ओळखले जातात. कधीही त्यांनी कोणताही बडेजाव केला नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अशोक सराफ हे थेट लॅम्बोर्गिनीमध्ये येऊन बसतात आणि गाडी घेऊन तेथून निघून जातात. हा व्हिडीओ पाहून अनेकजण चकीत झाले आहेत. अशोक सराफ यांनी इतकी महागडी गाडी कधी घेतली? असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. त्यांचा हा व्हिडीओ एआय जनरेटेड होता.
