
नाश्त्याच्या प्लेटमध्ये समोसा तसेच वाढदिवसाची पार्टीमध्ये समोसा असणे हे आता कॉमन असले तरी अनेकांना समोसा खायला खूप आवडतो. सकाळ असो वा संध्याकाळ, चहासोबत समोसे खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. जर आपल्या घरी पाहुणे आले तर आपण पहिला विचार येतो की जवळच्या दुकानातून समोसे आणावे कारण समोसे हे लहान मुले असोत किंवा मोठी माणसे, सगळेच खूप आवडीने खातात. पण तुम्हाला माहिती आहे का की समोसा आपल्या भारतीयांचा पदार्थांमधील अविभाज्य भाग कसा बनला? तर मग प्रश्न असा आहे की समोस्याचा इतिहास काय आहे आणि तो कुठून आला? हा कुरकुरीत, मसालेदार आणि स्वादिष्ट समोसा सर्वत्र सहज उपलब्ध आहे. चला तर मग आपल्या आवडत्या समोस्याबद्दल जाणून घेऊयात…
सर्वांचा आवडता समोसा, त्याचा प्रवासही खूप रंजक आहे. खरंतर आपल्या सर्वांच्या आवडीचा समोसा प्राचीन इराण साम्राज्यातून भारतात पोहोचला आणि तो पर्शियन भाषेत संबुसाग म्हणून ओळखला जात असे आणि नंतर त्याचे नाव समोसा पडले.
समोस्याचा इतिहास
अकराव्या शतकातील इराणी इतिहासकार अबुल फजल बैहाकी यांनी त्यांच्या ‘तारीख-ए-बैहाकी’ या पुस्तकात समोसाचा प्रथम उल्लेख केला आहे. त्यांनी गझनवीद साम्राज्याच्या राजदरबारात वाढल्या जाणाऱ्या नमकीन आणि सुक्यामेव्यांनी भरलेल्या एका चविष्ट पदार्थाचा उल्लेख केला. समोसा हा पदार्थ मध्य पूर्व आशियामध्ये 10 व्या शतकात तयार झाला.
समोसा भारतात कसा आला?
समोसा हा प्रत्येक भारतीयाला आवडणारा पदार्थ आहे. त्याची किंमतही कमी असल्याने प्रत्येक वर्गातील लोकं ते सहज खरेदी करून खाऊ शकतात. तर मग समोसा भारतात कसा पोहोचला ते जाणून घेऊया. असे म्हटले जाते की 13व्या-14व्या शतकात मध्य पूर्व आशियातील व्यापारी आणि मुस्लिम आक्रमक भारतात आले आणि येथूनच भारतात समोशाची कहाणी सुरू झाली. अमीर खुसरो आणि इब्न बतुता सारख्या लेखकांनीही त्यांच्या लेखनात समोशाचा उल्लेख केला आहे.
दिल्ली सल्तनतच्या अबुल फजलनेही ऐन ए अकबरीत शाही पदार्थांच्या यादीत समोशाचे नाव नोंदवले होते. 17व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात बटाटे आणले आणि तेव्हापासून बटाट्याचे समोसे बनवण्यास सुरुवात झाली. भारतात आल्यानंतर भारतीयांनी त्यांच्या पद्धतीने समोसे बनवायला सुरुवात केली. त्यात बटाटे, मीठ आणि मसाले भरले जात होते आणि आज समोसा हा प्रत्येक भारतीयांचा आवडीचा संध्याकाळचा नाश्ता बनला आहे.
समोशाची कहाणी जितकी रंजक आहे तितकीच भारतीयांनी ते प्रेम आणि आदराने स्वीकारले आणि समोशाची स्वतःची भारतीय आवृत्ती तयार केली जी आज सर्वांची आवडती बनली आहे.