
कॉलेजमध्ये प्रवेशाच्या प्रक्रियेसोबतच पालक आणि विद्यार्थ्यांसमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो की मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवावं की PG (पेइंग गेस्ट) मध्ये? दोघांमध्ये अनेक मूलभूत फरक असून, निर्णय घेताना विद्यार्थीचं वय, सवय, स्वावलंबन आणि सुरक्षेचा विचार करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. चला तर पाहूया हॉस्टेल आणि PG यामध्ये नक्की काय फरक आहे, कोणते फायदे-तोटे आहेत आणि पालकांनी काय काळजी घ्यायला हवी.
हॉस्टेल म्हणजे शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली निवास सुविधा. यामध्ये नियम-कायदे कठोर असतात यामध्ये येण्याजाण्याचा वेळ, जेवणाचं वेळापत्रक, बाहेरच्या व्यक्तींना प्रवेश अशा गोष्टी ठरलेल्या असतात. हॉस्टेल बहुधा कॉलेजच्या आवारातच किंवा जवळ असतो, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाचतो. हॉस्टेलमध्ये फीमध्ये भोजन, वीज, इंटरनेट, पाणी या सुविधा समाविष्ट असतात. विद्यार्थ्यांना एकत्र राहून मैत्री, सहकार्य आणि सामाजिक कौशल्य विकसित होतात.
PG हा “Paying Guest” (पेइंग गेस्ट) या शब्दाचा संक्षिप्त रूप आहे. PG ही अशी व्यवस्था असते जिथे विद्यार्थी किंवा नोकरी करणारे लोक दुसऱ्याच्या घरी किंवा खासगी इमारतीत भाड्याने राहतात आणि त्यासाठी ते दरमहा ठराविक रक्कम (भाडं) देतात. यामध्ये राहण्याच्या जागेसोबत जेवण, वाय-फाय, वीज, पाणी अशा काही सुविधा दिल्या जातात. काही वेळा त्या भाड्याच्या रकमेचा भाग असतात, तर काही वेळा वेगळ्या घेतल्या जातात.
हॉस्टेलमध्ये 24 तास वॉर्डन, सिक्युरिटी गार्ड आणि CCTV असतं, त्यामुळे पालकांचीही चिंता कमी होते. तसंच भोजन, पाणी, वीज आणि इंटरनेट या सगळ्या सुविधा एका ठराविक फीमध्ये मिळतात. हॉस्टेल कॉलेजच्या अगदी जवळ असतं, त्यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्चही वाचतो आणि एकाच वयाचे मुलं मुली सोबत असल्यामुळे मैत्री, सहकार्य आणि सामाजिक कौशल्यं देखील वाढतात.
हॉस्टेलमध्ये काही वेळा खूप कडक नियम असतात. ठराविक वेळेतच हॉस्टेलमध्ये यावं लागतं, बाहेरच्यांना आत यायची परवानगी नसते. त्यामुळे थोडा मोकळेपणा कमी वाटतो. तसंच बहुतांश वेळा खोली शेअर करावी लागते, त्यामुळे गोपनीयता कमी होते. जेवण ठराविक मेन्यूवरच असतं, त्यामुळे चव किंवा वैविध्य कमी वाटू शकतं. काही हॉस्टेल्समध्ये खोल्याही लहान असतात आणि AC किंवा खासगी बाथरूमसारख्या सुविधा नसतात.
PG म्हणजे पेइंग गेस्ट. येथे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार खोली निवडता येते आणि नियमदेखील थोडे कमी असतात, त्यामुळे वेळेचे जास्त बंधन नसतात. अनेक PG मध्ये AC, वाय-फाय, गरम पाणी, जेवण अशा सगळ्या सुविधा आपल्या बजेटनुसार निवडता येतात. याशिवाय PG वेगवेगळ्या लोकेशनवर उपलब्ध असतात, त्यामुळे तुम्हाला कॉलेजजवळ किंवा बाजाराजवळ राहता येतं.
PG चे तोटे:
PG खासगी व्यक्ती चालवतात, त्यामुळे ती सुरक्षीत असतीलच अशी नाही, तुम्हाला पाण्याचं, विजेचं, इंटरनेटचं आणि जेवणाचं वेगळं भाडं द्यावं लागू शकतं, त्यामुळे खर्च वाढतो. अनेक वेळा PG कॉलेजपासून लांब असतो, त्यामुळे प्रवासासाठी वेळ आणि पैसे लागतात. काही वेळा मालक खूप नियम लावतात किंवा गरजेच्या सुविधा योग्य पद्धतीने देत नाहीत. त्यामुळे PG निवडताना काळजीपूर्वक तपासणं गरजेचं आहे.