
दारूच्या दुकानात तुम्हाला जिन, रम, व्हिस्की, व्होडका आणि इतर प्रकारचे मद्य पहायला मिळते. या सर्व प्रकारच्या दारू एकाच ठिकाणी मिळत असल्या तरी त्यांची बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तसेच चव आणि किंमतीतही खूप जास्त फरक असतो. अनेक मद्यप्रेमींचं असं म्हणणं आहे की, जिन ही बॉटनिकल फ्लेवरमुळे स्ट्राँग असते. मात्र या मागील सत्य वेगळे आहे. आज आपण जिन, रम आणि व्हिस्कीमधील फरक काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.
जिनची खास चव ही ज्युनिपर बेरीपासून येते. जिनचा सुगंध फ्रेश पाइनसारखा असतो. असा सुगंध इतर कोणत्याही पेयाला नैसर्गिकरित्या मिळत नाही. जिनचा मुळ घटक हा न्यूट्रल ग्रेन स्पिरिट आहे, मात्र त्यात कालांतराने धणे, लिंबाची साल आणि वेलची सारखे पदार्थ टाकले जातात. त्यामुळे याची चव रम किंवा व्हिस्कीपेक्षा अधिक सुगंधी असते.
रम हे एक वेगळे पेय आहे, याची निर्मिती उसाच्या रसापासून किंवा मोलॅसिसपासून बनवली जाते. यामुळे रमला नैसर्गिक गोडवा मिळतो. यात कारमेल, ट्रेकल, केळी किंवा इरत फळांसारखे सुगंध टाकता येतात. व्हिस्की ही बार्ली, मका, राई किंवा गहू यांसारख्या धान्यांपासून बनवली जाते. मात्र व्हिस्कीला खरी चव ही लाकडी बॅरल मुळे येते. लाकडाच्या संपर्कात आल्यामुळे याची चव तर वाढतेच शिवाय रंग अधिक गडद बनतो.
जिन हे पेय डिस्टिलेशननंतर लगेच बाटलीत बंद केले जाते, तर रम आणि व्हिस्की किती जास्त दिवस बॅरलमध्ये साठवली जाते त्यावर त्याची चव अवलंबून असते. जिनला बॉटनिकल्ससह पुन्हा डिस्टिल्ड केले जाते, ज्यामुळे तिला आणखी सुगंध येतो. तर रम उसापासून फर्मेंटेशनद्वारे बनवली जाते. तर व्हिस्कीमध्ये माल्टिंग, मॅशिंग, फर्मेंटेशन याच्यासह साठवणूकीचा समावेश असतो.
अनेक मद्यप्रेमींना वाटते की जिन अधिक स्ट्राँग आहे, मात्र बहुतेक जिन, रम आणि व्हिस्की ब्रँड 40% ABV वर बाटलीबंद केले जातात. याचाच अर्थ या तिन्हीपैकी कोणत्याही मद्यात नैसर्गिकरित्या अल्कोहोल जास्त नसते. मात्र जिनच्या कडक चवीमुळे ती इतर मद्यांपेक्षा थोडी स्ट्राँग वाटू शकते.