वीजबिल वाढतंय का? मग एसी वापरताना ‘हे’ नियम लक्षात ठेवा!
उन्हाळ्यात प्रचंड उकाडा आणि तापमानवाढीमुळे अनेक कुटुंबांच्या घरात एसी हा एक अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, सतत एसी वापरण्यामुळे वीजबिलाचा भडका उडतो आणि एसीवरही ताण येतो. मग एसी दिवसभर वापरणं योग्य आहे का? दिवसात किती तास एसी चालवायला हवा? आणि कोणत्या तापमानावर चालवल्यास शरीराला आराम मिळतो पण वीजबिलही कमी येतं? हे सर्व प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.

सध्या उत्तर भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाचा कडाका इतका वाढला आहे की, अनेक कुटुंबं घरात दिवसरात्र एसी चालू ठेवत आहेत. मात्र, सतत एसी वापरल्याने एकीकडे शरीराला आराम मिळतो, पण दुसरीकडे वीजबिल वाढण्याचा मोठा धोका असतो. त्यामुळे एसी किती वेळ वापरावा आणि कोणत्या तापमानावर चालवावा हे जाणून घेणं गरजेचं आहे.
दिवसभरात किती तास एसी वापरावा?
तज्ज्ञांच्या मते कोणताही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस सतत चालू ठेवणं हे त्याच्या कार्यक्षमतेसाठी घातक ठरू शकतं. एसीही त्याला अपवाद नाही. त्यामुळे जर तुम्ही दिवसातून ८ तासांपर्यंत एसी वापरत असाल, तर तो एक ‘बॅलन्स्ड’ पर्याय ठरतो. या कालावधीत तुम्हाला आवश्यक थंडावा मिळतो आणि एसीच्या यंत्रणेवरही फारसा ताण येत नाही. हे वापर पद्धतशीर असल्यास, दीर्घकाळ एसीची सेवा घेता येते आणि वीजबिलावरही नियंत्रण राहते.
तसेच, रात्री झोपताना तुम्ही एसीला टायमर मोड लावून ३-४ तासांसाठी सेट करू शकता. यामुळे झोप सुरू होतानाच शरीराला थंडावा मिळतो आणि नंतर एसी बंद झाल्यावरही खोली काही वेळ गार राहते.
योग्य तापमान कोणतं?
उकाडा असताना अनेकजण एसीचं तापमान १८ अंश सेल्सियसवर ठेवतात. पण हे चुकीचं आहे. इतक्या कमी तापमानावर एसी चालवल्यास यंत्रणेवर प्रचंड लोड येतो, आणि परिणामी वीजबिल देखील झपाट्याने वाढू शकतं. त्यामुळे एसीचा योग्य वापर करण्यासाठी त्याचं तापमान २४ ते २६ अंश सेल्सियस ठेवणं अधिक फायदेशीर आहे.
एसी विकत घेताना या टीप्स करा फॉलो
तुमच्या खोलीचा आकार बघून एसीची टन क्षमता ठरवावी. लहान खोलीसाठी 1 टन, मध्यम आकाराच्या खोलीसाठी 1.5 टन आणि मोठ्या खोलीसाठी 2 टन एसी योग्य ठरतो. चुकीचा टन निवडल्यास एसी जास्त वीज वापरतो आणि कूलिंगही समाधानकारक राहत नाही.
इन्व्हर्टर एसी हे ऊर्जा कार्यक्षम असतात आणि दीर्घकाळ टिकतात. ते गरजेनुसार कंप्रेसरची स्पीड बदलतात, ज्यामुळे वीजेची बचत होते. नॉन-इन्व्हर्टर एसी स्वस्त असले तरी दीर्घकाळात खर्च जास्त होतो.
कॉपर कॉइल असलेले एसी जलद कूलिंग करतात, त्यांचा मेंटेनन्स कमी लागतो आणि ते टिकाऊही असतात. त्यामुळे शक्यतो कॉपर कॉइल असलेले एसी निवडावेत.
याशिवाय, एसीची नियमित सर्व्हिस करणे, फिल्टर वेळोवेळी साफ करणे हे देखील गरजेचे आहे. यामुळे यंत्रणा नीटस चालते, थंड हवा व्यवस्थित येते आणि एसी दीर्घकाळ टिकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
