डिअर लेडीज! संकटात ‘हे’ सरकारी ॲप ठरेल तुमचा सुरक्षा कवच; एका क्लिकवर मिळेल मदत
Woman Safety App: महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने 112 इंडिया ॲप लॉन्च केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे ॲप मदतीसाठी उपयुक्त ठरू शकते. हे ॲप नेमके कसे काम करते आणि यात कोणते इमर्जन्सी फीचर्स आहेत, जाणून घ्या...

संकटाची वेळ सांगून येत नाही आणि अशा वेळी मदतीसाठी गेलेला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा ठरतो. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असो किंवा अचानक निर्माण झालेली कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, वेळेत मदत मिळणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा घटनेनंतर पोलिसांना फोन करून परिस्थिती समजावून सांगण्यात आणि त्यानंतर घटनास्थळी मदत पोहोचण्यात काही वेळ जातो. हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने 112 इंडिया ॲप उपलब्ध करून दिले आहे.
हे ॲप महिला, मुली तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी ठरू शकते. संकटाच्या वेळी ॲपच्या माध्यमातून मदतीसाठी अलर्ट पाठवता येतो आणि आवश्यक माहिती संबंधित यंत्रणेला मिळू शकते. Android युजर्ससाठी हे ॲप Google Play Store, तर iPhone युजर्ससाठी App Store वर उपलब्ध आहे. या ॲपमध्ये कोणती फीचर्स आहेत आणि संकटाच्या वेळी ते कसे काम करते, जाणून घेऊया.
एकाच ॲपमध्ये 7 इमर्जन्सी सुविधा
112 इंडिया ॲपमध्ये पोलिस, फायर, मेडिकल, आपत्ती व्यवस्थापन, महिला सुरक्षा, पॅनिक सिच्युएशनसाठी SOS आणि Track Me अशा सात सुविधा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या आपत्कालीन परिस्थितीत एकाच अॅपच्या माध्यमातून मदत मागता येते.
कसे काम करते ॲप?
ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या इमर्जन्सी सर्व्हिसपैकी एखादा पर्याय निवडल्यानंतर ५ सेकंदांचा काउंटडाउन सुरू होतो. काउंटडाउन पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्याचे लोकेशन पोलिस कंट्रोल रूमपर्यंत पोहोचते. त्यानंतर मदती संदर्भात माहिती घेण्यासाठी फोनही येतो. त्यामुळे वारंवार आपले लोकेशन सांगण्याची गरज राहत नाही.
पॅनिक सिच्युएशनमध्ये SOS बटन ठरेल मदतीचा आधार
अचानक संकटात सापडल्यास काय करावे हे सुचत नसेल, तर अॅप मधील SOS बटन दाबता येते. SOS सक्रिय केल्यानंतर अलर्ट पोलिसांपर्यंत पोहोचतो. यासोबतच मदत कुठपर्यंत पोहोचली आहे, हेही ट्रॅक करता येते.
‘Track Me’ फीचरही मिळणार
प्रवास करताना असुरक्षित वाटत असल्यास ॲप मधील ‘Track Me’ पर्यायाचा वापर करता येतो. हा पर्याय सुरू केल्यानंतर पोलिसांकडून युजरचे लोकेशन ट्रॅक केले जाते. त्यामुळे प्रवासादरम्यान सुरक्षिततेसाठी हे फीचर उपयोगी ठरू शकते.
Emergency Contacts कसे जोडायचे?
या ॲपमध्ये आपत्कालीन संपर्क क्रमांकही जोडता येतात. त्यासाठी आधी ॲप डाउनलोड करून मोबाइल नंबर नोंदवावा लागतो. त्यानंतर आलेल्या OTPच्या माध्यमातून नंबर व्हेरिफाय करावा. सर्व माहिती भरल्यानंतर Settings मध्ये जाऊन Emergency Contact वर क्लिक करावे आणि ‘Add Contact’ हा पर्याय निवडावा.