कांद्याची साल फेकण्याआधी थांबा! केसांसाठी ‘असा’ करा वापर, मिळतील ३ फायदे

Hair Care Tips: कांदा सोलल्यानंतर त्याची साल थेट कचऱ्यात फेकता? थांबा! तुमच्या स्वयंपाकघरातील ही टाकाऊ वाटणारी साल केसांसाठी चक्क फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या केसांसाठी हे ३ पद्धतीने कसे वापरावे.

कांद्याची साल फेकण्याआधी थांबा! केसांसाठी ‘असा’ करा वापर, मिळतील ३ फायदे
hairs
Image Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 03, 2026 | 12:13 PM

केसांची काळजी घेण्यासाठी महागडी उत्पादनेच आवश्यक असतात असे नाही. आपल्या घरात सहज उपलब्ध असलेल्या काही साध्या गोष्टींचाही हेअर केअरसाठी उपयोग करता येतो. विशेष म्हणजे, स्वयंपाकघरात रोज वापरल्या जाणाऱ्या कांद्याची सालही यापैकी एक आहे. कांदा सोलल्यानंतर आपण ही साल सहसा कचऱ्यात फेकून देतो. मात्र, तिचा योग्य पद्धतीने वापर केल्यास केसांसाठी ती उपयुक्त ठरू शकते. कांद्याच्या सालीपासून नैसर्गिक हेअर डाय, हेअर टोनर आणि हेअर मास्क तयार करता येतो. केसांसाठी कांद्याच्या सालीचा उपयोग कसा करायचा, तसेच त्याचे कोणते फायदे होऊ शकतात, जाणून घेऊया.

तयार करा नैसर्गिक हेअर डाय

Loading...

कांद्याच्या सालीपासून केसांसाठी नैसर्गिक रंग तयार करता येतो. यासाठी दोन मूठ वाळलेल्या कांद्याच्या साली आणि सुमारे तीन चमचे खोबरेल तेल लागते. लोखंडी कढईमध्ये कांद्याच्या साली काळसर होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्याची पावडर करून त्यामध्ये खोबरेल तेल मिक्स करा. तयार झालेले मिश्रण केसांना डायप्रमाणे लावता येते.
हेअर टोनर बनवा

कांद्याच्या सालींचा वापर हेअर टोनर तयार करण्यासाठीही करता येतो. यासाठी दोन मूठ कांद्याच्या साली, एक मूठ कढीपत्ता आणि सुमारे दीड ग्लास पाणी घ्या. कांद्याच्या साली आणि कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. पाण्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करून हे मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर हे पाणी गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि केसांवर टोनरप्रमाणे वापरा.

हेअर मास्कही करता येतो

कांद्याच्या सालींचा वापर करून घरच्या घरी हेअर मास्कही तयार करता येतो. यासाठी एक मूठ कांद्याच्या साली, एक ग्लास पाणी आणि दोन चमचे दही घ्या. प्रथम कांद्याच्या साली पाण्यात चांगल्या प्रकारे उकळून घ्या. त्यानंतर हे पाणी गाळून त्यामध्ये दही मिक्स करा. तयार झालेली पेस्ट केसांना लावून साधारण एक तास ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा.

केसांसाठी कांद्याच्या सालीचे फायदे

कांद्याच्या सालीमध्ये क्वेरसेटिनसारखे फ्लेव्होनॉइड, फेनोलिक कंपाउंड्स आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने कांद्याच्या सालीचा वापर रंग तयार करण्यासाठी केला जातो. केसांसाठी वापरल्यास त्यापासून हलकी तपकिरी किंवा सोनेरी शेड मिळू शकते. तसेच स्काल्प निरोगी ठेवण्यास आणि केसांना चमक मिळण्यास मदत होऊ शकते.

टीप – कांद्याच्या सालीपासून तयार केलेली कोणतीही गोष्ट केसांना किंवा स्काल्पला लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. प्रत्येकाची त्वचा आणि हेअर स्काल्प वेगवेगळे असतात. त्यामुळे हे लावल्यानंतर खाज, जळजळ, लालसरपणा किंवा कोणत्याही प्रकारची एलर्जी जाणवल्यास त्याचा वापर त्वरित थांबवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us