कानाला ब्लूटूथ हेडफोन लावाल तर कॅन्सरचा धोका? तज्ज्ञांनीच सांगितलं नेमकं सत्य काय!
आजकाल आपण दररोज ब्लूटूथ इअरफोन वापरत असतो. पण कधी कधी आपल्याला प्रश्न पडतो की हे इअरफोन वापरल्यामुळे कर्करोग तर होणार नाही ना. जाणून घ्या काय आहे सत्य...

आजकाल चालताना-फिरताना किंवा काम करताना प्रत्येकाच्या कानात ब्लूटूथ इअरफोन दिसतात. हे वायरलेस हेडफोनचे तंत्रज्ञान इतके सामान्य झाले आहे की, आजच्या काळातील एक सामान्य गॅजेट म्हणून ओळखले जाते. पण याबाबत लोकांच्या मनात नेहमी प्रश्न असतो की, हे वापरणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते का? खरं तर, ब्लूटूथ डिव्हाइसेस रेडिएशन सोडतात, पण याचा अर्थ असा नाही की वायरलेस इअरबड्समुळे तात्काळ धोका निर्माण होतो.
२०१५ साली, काही शास्त्रज्ञांच्या गटाने एका याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या होत्या, ज्यात नॉन-आयोनायझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड (ईएमएफ) तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या संभाव्य आरोग्य धोक्यांबाबत, जसे कर्करोग, गंभीर चिंता व्यक्त केली होती. ब्लूटूथ डिव्हाइसेस हे ईएमएफ तंत्रज्ञानावरच काम करतात. तरीही, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (एनसीआय) स्पष्ट सांगते की, आतापर्यंत असा कोणताही वैज्ञानिक पुरावा सापडलेला नाही, जो वायरलेस डिव्हाइसेसचा वापर थेट कर्करोग किंवा इतर आजारांशी जोडतो. उलट, संस्था ब्लूटूथला मोबाईल फोन वापरण्याच्या तुलनेने सुरक्षित मार्ग मानते. मग प्रश्न उरतो की, ब्लूटूथ तंत्रज्ञान असलेल्या वायरलेस हेडफोनमुळे कर्करोगासारख्या गंभीर धोक्याचा कितपत धोका आहे?
कर्करोगाचा धोका किती?
ब्लूटूथ हे असे तंत्रज्ञान आहे जे दोन डिव्हाइसेसमधील कमी अंतरात वायरलेस कनेक्शन तयार करते. यात शॉर्ट-रेंज रेडियो फ्रिक्वेन्सी (आरएफ) चा वापर होतो, ज्यामुळे जवळील डिव्हाइसेस एकमेकांशी जोडले जातात. ब्लूटूथ डिव्हाइसेस रेडियो फ्रिक्वेन्सी रेडिएशन वापरतात, हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचाच एक प्रकार आहे, जो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डद्वारे वेव्जमध्ये पसरते. आरएफ रेडिएशन नैसर्गिक आणि कृत्रिम, दोन्ही स्वरूपात असते. मोबाईल फोन, एफएम रेडियो आणि टेलिव्हिजनही असेच रेडिएशन सोडतात.
तज्ज्ञ काय सांगतात?
युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनियाच्या बायोइंजिनियरिंग प्रोफेसर एमेरिटस केन फोस्टर यांच्या मते, ब्लूटूथ डिव्हाइसेस मोबाईल फोनच्या तुलनेत थोडे कमी रेडिएशन सोडतात. जर एखादी व्यक्ती रोज अनेक तास ब्लूटूथ हेडफोन वापरत असेल, तर एक्सपोजर वाढू शकते, पण तरीही ते मोबाईल फोन कानाला लावून बोलण्यापेक्षा कमी असते.
२०२५ पर्यंतच्या अनेक अभ्यासांनुसार (नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, अमेरिकन कॅन्सर सोसायटी आणि डब्ल्यूएचओच्या माहितीवर आधारित), ब्लूटूथ इयरबड्स किंवा हेडफोनमुळे कर्करोग होण्याचा थेट पुरावा नाही. ब्लूटूथचे रेडिएशन सेल फोनपेक्षा १० ते ४०० पट कमी असते आणि ते नॉन-आयोनायझिंग स्वरूपाचे असल्याने डीएनएला थेट नुकसान पोहोचवत नाही.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)
