फ्लावरची भाजी खाताना नाक मुरडताय? मग ‘ही’ रेसिपी करा ट्राय, लहानांसह मोठेही खातील चाटून-पुसून
लहान मुले भाज्या खाण्यास टाळतात का? फ्लावरसारख्या भाज्यांचा वापर करून पौष्टिक आणि चविष्ट पराठे बनवा. हे पराठे बनवणे सोपे आहे आणि त्यात कमी साहित्य लागते. सर्व घटक एकत्र करून पराठे तयार करा आणि तुमच्या कुटुंबाला हे पौष्टिक आणि चवदार जेवण दाखवा.

Cauliflower Paratha Recipe : “ऐ आई… काय ग सतत तीच तीच फ्लावर, कोबी, वटाण्याची भाजी बनवतेस. कधीतरी टेस्टी, चांगलं चमचमीत बनवत जा…” असं तुमचीही मुलं तुम्हाला बोलतात का? लहान मुलं भाज्या खाताना अनेकदा तोंड वाकडं करतात. त्यात कारलं, कोबी, फ्लावर या भाज्या डब्ब्याला दिल्या किंवा जेवणात केल्या की ते चिडचिड करायला लागतात. रोज रोज डब्ब्याला काय बनवायचं? असा प्रश्न सर्वच गृहिणींना पडलेला असतो. त्यात पौष्टिक खायला देणं हे देखील मोठे आव्हान असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला एक अशी रेसिपी सांगणार आहोत जी बनवल्यानंतर लहान मुलंच काय तर मोठी माणसंही चाटून पुसून खातील
फ्लावर ही भाजी खाताना सर्वजण तोंड वाकडं करतात. पण त्याच फ्लावरपासून जर तुम्ही पौष्टिक पराठे बनवले तर निश्चित तुम्हाला मोठा फायदा मिळेल. फ्लावरचे पराठे बनवण्याची रेसिपी आणि त्यासाठी लागणारे साहित्य फारच कमी आहे. विशेष म्हणजे हे बनवण्यासाठी तुम्हाला अजिबात जास्त कष्ट करावे लागणार नाहीत.
साहित्य
- 1 कप गव्हाचे पीठ
- 1 कप फ्लावर
- कोथिंबीर
- आवश्यकतेनुसार मीठ
- 1 चमचा गरम मसाला
- 1 चमचा लाल तिखट मसाला
- 1 चमचा आमचूर पावडर
- 1 चमचा धणे पावडर
- 1 चमचा जिरे पावडर
- 1 चमचा हळद
कृती
- सर्वप्रथम फ्लावर स्वच्छ धुवून घ्या. यानंतर ते किसून घ्या.
- कढईत दोन ते तीन चमते तेल गरम करुन त्यात किसलेले फ्लावर घाला. फ्लावर पूर्ण कोरडा होईपर्यंत तो शिजवा.
- त्यानंतर यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घाला. त्यानंतर पुन्हा परतून घ्या.
- यानंतर आता फ्लावरमध्ये लाल मसाला, धणेपूड, हळद, जिरेपूड, आमचूर पावडर हे सर्व घालून एकत्र करुन घ्या.
- आता त्यात चवीनुसार मीठ आणि गरम मसाला घालून २ ते ४ मिनिटे मिश्रण शिजू द्या. आता त्यावर कोथिंबीर घाला.
- यानंतर गव्हाच्या पिठात मीठ आणि पाणी एकत्र करुन मळून घ्या. त्यात व्यवस्थित तेल घालून कणकेचा गोळा तयार करा.
- यानंतर मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून लहान पोळी लाटून घ्या.
- त्यात फ्लावरचे मिश्रण घालून पुरणपोळीप्रमाणे पुन्हा गोळा करा. आता त्याची पुन्हा पोळी लाटा.
- पोळी लाटताना त्यावर जास्त जोर देऊ नका, नाहीतर त्यातील मसाला बाहेर येऊ शकतो.
- यानंतर गरम तव्यावर पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. भाजलेल्या गरमागरम पराठ्यावर साजूक तूप किंवा तेल घाला आणि नंतर हा गरमा गरम पराठा दही, लोणचं, लोणी, टोमॅटो केचप, हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करु शकता.
