Valentine’s 2023 : Rose Day पासून सुरू होतो व्हॅलेंटाईन वीक, जाणून घ्या व्हॅलेंटाईन डे पर्यंत या 7 दिवसांत काय असते खास ?

| Updated on: Feb 07, 2023 | 2:44 PM

व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात रोझ डे ( Rose Day) पासून सुरू होते. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला छानसं गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करू शकता.

Valentine’s 2023 : Rose Day पासून सुरू होतो व्हॅलेंटाईन वीक, जाणून घ्या व्हॅलेंटाईन डे पर्यंत या 7 दिवसांत काय असते खास ?
Image Credit source: Freepik
Follow us on

नवी दिल्ली – दरवर्षी फेब्रुवारी महिना सुरू झाला की प्रेमाचे वारे वाहू लागतात. हा महिना प्रेमवीरांसाठी अगदी खास असतो, कारण या महिन्यात व्हॅलेंटाइन डे (Valentines Day) असतो ना !  7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत व्हॅलेंटाईन वीक (Valentines Week) साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात रोझ डे ( Rose Day) पासून सुरू होते. या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला छानसं गुलाबाचं फूल (Rose) देऊन प्रेम व्यक्त करू शकता. 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक दिवस प्रेमवीरांसाठी अतिशय स्पेशल असतो.

तरुणाई व्हॅलेंटाईन वीकची आतुरतेने वाट पाहत असते. व्हॅलेंटाईन डे हा जोडप्यांसाठी खूप खास असतो. बहुतांशी जोडपी हा संपूर्ण आठवडा एका खास पद्धतीने साजरा करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी या आठवड्यातील प्रत्येक दिवस तरुणाई खास दिवस म्हणून साजरा करतात. ते एकमेकांना भेटवस्तू देऊन, प्रेम व्यक्त करतात. याला वयाचे कोणतेच बंधन नाही. अगदी हळूवार वयातील प्रेमापासून ते विवाहीत जोडप्यांपर्यंत आणि वृद्धापकाळात आपल्या साथीदाराच्या सहवासातही हे प्रेमाचे दिवस साजरे करता येतात. व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो आणि या आठवड्यातील 7 दिवसांमध्ये काय खास आहे ते जाणून घेऊ या.

व्हॅलेंटाईन डे का साजरा करतात ?

हे सुद्धा वाचा

व्हॅलेंटाईन डे हा संत व्हॅलेंटाईनच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. असे मानले जाते की तिसऱ्या शतकात रोममध्ये क्लॉडियस नावाचा अतिशय शक्तिशाली साम्राज्याचा राजा होता आणि त्याचे साम्राज्य आणखी वाढवण्यासाठी त्याला मोठ्या सैन्याची आवश्यकता होती. म्हणून त्याने संपूर्ण राज्यात असा आदेश जारी केला की कोणताही अधिकारी किंवा सैनिक लग्न करणार नाही. लग्न केल्याने पुरूष हा कमकुवत होतो, त्याची बुद्धिमत्ता आणि शक्ती कमी होते, असे राजा क्लॉडियसला वाटायचे. म्हणून त्याने सैनिकांच्या लग्नावर बंदी घालत ते बेकायदेशीर घोषित केले होते.

पण संत व्हॅलेंटाईन यांनी राजाच्या या अन्यायकारी निर्णयाला विरोध करत तरूण सैनिकांना लग्न करण्यास प्रोत्साहन दिले. त्यांनी अनेकांची लग्नही लावून दिली. राजा क्लॉडियसला हे समजताच, त्याचा राग अनावर झाला व त्याने संत व्हॅलेंटाईन कैद करून मृत्यूदंड दिला. त्या दिवशी 14 फेब्रुवारी हीच तारीख होती. त्यामुळे प्रेमाला प्रोत्साहन देणारे संत व्हॅलेंटाईन यांच्या मृत्यूनंतर 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो.

व्हॅलेंटाईन वीकच्या 7 दिवसांचे खास महत्व 

7 फेब्रुवारी रोझ डे

व्हॅलेंटाईन वीकची सुरूवात रोझ डे ने होते. या आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे 7 फेब्रुवारी हा रोझ डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रेमी जोडपी आपापल्या पार्टनरला गुलाबाचे फूल देऊन आपले प्रेम व्यक्त करतात. लाल रंगाचे गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तुमचेही कोणावर प्रेम असेल तर त्याला लाल गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकत.

8 फेब्रुवारी प्रपोज डे

प्रपोझ डे, या नावावरूनच या दिवसाचे महत्व कळते. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी लग्न करण्याची इच्छा असेल तर 8 फेब्रुवारीचा दिवस खूपच विशेष ठरतो. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी हा दिवस उत्तम ठरतो. प्रपोज करताना तुम्ही केक, फुलं, एखादी रिंग किंवा त्या व्यक्तीची आवडती वस्तू देऊ शकता.

9 फेब्रुवारी चॉकलेट डे

9 फेब्रुवारी रोजी, प्रेमी व्यक्ती आपल्या जोडीदाराला चॉकलेट देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करतात. चॉकलेटचा गोडवा नात्यात गोडवा वाढवतो. या दिवशी तुम्ही अनेक चॉकलेट्स गिफ्ट म्हणून तुमच्या पार्टनरला देऊ शकता आणि त्यांच्यासोबत हा दिवस सेलिब्रेट करू शकता.

10 फेब्रुवारी टेडी डे

10 फेब्रुवारी रोजी, प्रेमी एकमेकांना लाल टेडी देऊन त्यांचे प्रेम व्यक्त करतात. या दिवशी बहुतेक मुले आपल्या प्रेयसीला टेडी गिफ्ट करतात कारण की मुलींना टेडिबेअर खूपच आवडतात, असे मानले जाते. म्हणूनच आपल्या प्रेयसीला इंप्रेस करण्यासाठी अनेक मुले टेडी गिफ्ट म्हणून देतात.

11 फेब्रुवारी प्रॉमिस डे

11 फेब्रुवारी रोजी प्रॉमिस डे साजरा केला जातो. या दिवशी प्रेमवीर आपल्या पार्टनरला शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहण्याचे वचन देतात. म्हणून या दिवशी प्रॉमिस डे म्हणून साजरा केला जातो.

12 फेब्रुवारी हग डे

व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस हग डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरला हग देऊन म्हणजेच मिठीत घेऊन हा दिवस साजरा केला जातो त्याचबरोबर आपली आवडती व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे हे सुद्धा सांगण्याचा हा दिवस असतो.

13 फेब्रुवारी किस डे

13 फेब्रुवारी हा किस डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या पार्टनरसोबत असलेले नातेसंबंध आणि बॉण्ड मजबूत बनवण्याचा दिवस मानला जातो म्हणूनच या दिवशी पार्टनरला किस करून हा दिवस साजरा केला जातो.

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे

व्हॅलेंटाईन वीकचा आठवा आणि शेवटचा दिवस, हा 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा केला जातो. बहुतांश जोडपी हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. या दिवशी तुम्ही तुमच्या पार्टनर सोबत चांगला वेळ घालवू शकता. तुमच्या प्रेमाचा, नात्याचा गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही वेगवेगळे प्लॅन्स करून सेलिब्रेशनही करू शकता.