
स्किन केअरच्या बाबतीत आजकाल प्रत्येकजण घरगुती उपाय करण्याकडे वळत आहे. कारण हे उपाय केल्याने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाही. त्यासोबतच स्किन केअर करताना वापरण्यात आलेले नैसर्गिक घटक प्रभावी परिणाम देऊ शकतात. विशेषतः औषधी वनस्पती अत्यंत पॉवरफुल असतात. म्हणूनच अनेक स्किन केअर प्रोडक्ट बनवणारे ब्रँड्स त्यांच्या उत्पादनांमध्ये औषधी वनस्पतींचा वापर करतात. मात्र या उत्पादनांमध्ये अनेकदा प्रिझर्व्हेटिव्ह घटक मिसळलेले असतात. अशातच या उन्हाळ्यात तुमची त्वचा काळंवडलेली असेल तर पुन्हा चमक आणण्यासाठी त्वचेवर ज्येष्ठमधाचा वापर करा. बहुतेक लोकं घशातील खवखव कमी करण्यासाठी ज्येष्ठमध चघळतात, पण तुम्हाला माहित आहे का की त्याचे तुमच्या त्वचेवरही आश्चर्यकारक परिणाम होऊ शकतात.
तुमच्या त्वचेवर डाग, उन्हामुळे त्वचेचा काळपटपणा आणि निस्तेजपणा यांसारख्या समस्या सतत जाणवत असतील, तर सोशल मीडियावर सुचवलेले प्रत्येक स्किन केअर प्रोडक्ट खरेदी करणे टाळा. आरोग्यापासून ते त्वचेच्या काळजीपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आयुर्वेदात उपाय सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्येष्ठमधाचे त्वचेसाठी असलेले फायदे आणि त्याचा वापर कसा करायचा हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊयात.
त्वचेसाठी ज्येष्ठमध उत्तम
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये दिलेल्या माहितीनुसार ज्येष्ठमध तुमच्या त्वचेचा रंग सुधारू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की, त्याच्या अर्कामुळे मेलॅनिनची पातळी कमी होते. मेलॅनिन हा त्वचेच्या रंगासाठी जबाबदार असलेला घटक आहे. मेलॅनिनची उच्च पातळी त्वचेचा रंग गडद होण्यास कारणीभूत ठरू शकते. ज्येष्ठमध हायपरपिगमेंटेशन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे , ज्यामुळे त्वचा अधिक नितळ होते. त्यात अँटी-ॲलर्जिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत, जे सूज कमी करण्यास मदत करू शकतात.
चेहऱ्यावर ज्येष्ठमधाचा वापर कसा करावा?
तुम्हाला जर तुमच्या स्किन केअर रुटीनमध्ये ज्येष्ठमधाचा समावेश करायचा असेल, तर तुम्ही त्याचा फेस पॅक बनवून लावू शकता. बाजारातून ज्येष्ठमधाची पावडर विकत घेणे टाळा, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता असते. अख्खा ज्येष्ठमध विकत घेणे उत्तम. तो 1-2 दिवस उन्हात ठेवा, नंतर त्याची बारीक पावडर बनवा. ती एका हवाबंद डब्यात साठवून ठेवा.
ज्येष्ठमधाचा फेस पॅक बनवा
तुम्ही तुमच्या गरजेनुसार तयार केलेल्या ज्येष्ठमधाच्या पावडरपैकी एक किंवा दोन चमचे पावडर घ्या. ही पावडर दह्यामध्ये मिक्स करून एक गुळगुळीत पेस्ट बनवा. जर जास्त काळे डाग असतील, तर त्यात एक किंवा दोन चमचे टोमॅटोचा रस टाका. या सोप्या टप्प्यांमध्ये तुमचा ज्येष्ठमधाचा फेस पॅक तयार आहे. ज्येष्ठमधासोबतच दही देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
हा फेस पॅक कसा लावावा?
हा फेस पॅक तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर व्यवस्थित लावा. तो किमान 20 मिनिटे किंवा 90 टक्के सुकेपर्यंत तसाच राहू द्या. त्यानंतर, ओल्या स्पंजने चेहरा स्वच्छ करा किंवा साध्या पाण्याने धुवा. लक्षात ठेवा फेस पॅक लावल्यानंतर कोणताही साबण वापरू नका.
या वेळेला फेस पॅक लावणे सर्वोत्तम आहे
तुम्ही हा फेस पॅक तुमच्या रात्रीच्या स्किनकेअर रुटीनमध्ये समाविष्ट करू शकता. सर्वप्रथम, तुमचा चेहरा धुवा. त्यानंतर, फेस पॅक लावा, चेहरा स्वच्छ करा आणि मग नेहमीप्रमाणे मॉइश्चरायझर व टोनर लावा. तुम्ही हा फेस पॅक आठवड्यातून तीन वेळा, किमान एक दिवसाआड लावू शकता.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)