पुरूषांनो, इकडे लक्ष द्या ! आजारी पडायचं नसेल तर वैयक्तिक स्वच्छतेच्या या सवयी पाळाच..

वैयक्तिक स्वच्छतेच्या या सवयींचे सर्वांनी पालन केले पाहिजे. त्याने आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

पुरूषांनो, इकडे लक्ष द्या ! आजारी पडायचं नसेल तर वैयक्तिक स्वच्छतेच्या या सवयी पाळाच..
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 19, 2023 | 6:07 PM

Hygiene Habits Men Should Follow : आजार आणि इन्फेक्शनपासून दूर राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनेच वैयक्तिक स्वच्छतेची (cleanliness) विशेष काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेणे आपल्यासाठी तसेच आपल्या सभोवतालच्या लोकांसाठीही चांगले ठरते. काही आरोग्यदायी सवयींचे पालन (good habits) केल्याने शरीर अनेक आजारांपासून वाचू शकते.

अनेक पुरुषांना स्वच्छतेचे महत्त्व कमी माहिती असते, तर काही त्याकडे सरळ दुर्लक्ष करतात. त्यामुळे ते बरेच वेळा आजारी पडतात किंवा त्यांना आरोग्यासंबंधी त्रास सहन करावा लागतो. आपल्या रोजच्या आयुष्यात वैयक्तिक स्वच्छतेशी (personal hygiene) निगडीत काही चांगल्या सवयींचे पालन केल्यास शरीर सुदृढ राहतेच आणि आजारांपासूनही बचाव होतो. पण अनेक पुरुषांना असं वाटतं की नियमितपणे आंघोळ करणे, दाढी करणे किंवा डिओडरंटचा वापर करणे, म्हणजेच स्वच्छता होय. पण असं नसतं.

काही अशा सवयींबद्दल जाणून घेऊया ज्याचे पालन केल्याने पुरुष दीर्घकाळ निरोगी आणि आजारांपासूनही सुरक्षित राहू शकतील.

दररोज आंघोळ करणे

रोज आंघोळ किंवा स्ना केल्याने शरीर तर स्वच्छ होतंच पण मानसिक स्तरावरही आराम मिळतो. अनेक वेळा आंघोळ न केल्यामुळे तणाव किंवा अस्वस्थता कायम राहते. अशा परिस्थितीत पुरुषांनी हवामानानुसार दररोज गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ करावी. त्यामुळे शरीर स्वच्छ होते व प्रसन्न, फ्रेश वाटते.

नखं कापणं

वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेताना पुरुषांनी नियमितपणे हाता-पायाची नखंही कापली पाहिजेत. छोट्या नखांमुळे शरीराचे सौंदर्य वाढतेच आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो. जर नखं मोठी, अस्वच्छ असतील , तर त्यातून वास येऊ शकतो, ते शरीरासाठीही हानिकारक असते.

न धुतलेले कपडे वा मोजे न वापरणं

पुरुषांनी वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेताना न धुतलेले कपडे किंवा मोजे घालू नयेत. अशा कपड्यांमध्ये ओलावा असेल तर दुर्गंध येऊ शकतो. तर घाणेरडे मोज्यांमुळे पायांवर बुरशी येऊ शकते. धुतलेले कपडे घातल्याने कोणतेही इन्फेक्शन टाळता येते. चांगल्या आरोग्यासाठी उत्तम ठरते.

श्वासाचा दुर्गंध टाळा

कोणाशीही बोलताना तोंडाला किंवा श्वासाला दुर्गंध येऊ नये याचीही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नियमित ब्रश करणे, तसेच जीभ साफ करणेही महत्वाचे ठरते. श्वासाला दुर्गंध आल्यास लाजीरवाणे वाटू शकते, तसेच ते अस्वच्छतेचेही लक्षण आहे.

कानातला मळ साफ करा

कानात बऱ्याच काळापर्यंत मळ साठून राहिल्यास ऐकण्याची क्षमता कमी होणे, जळजळणे, कान दुखणे, वेदना, चक्कर येणे, कानातून आवाजा येणे अशा समस्या सहन कराव्या लागू शकतात. अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून वेळोवेळी कानातला मळ काढून कान साफ केला पाहिजे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)