सावधान! या रक्तगटाच्या लोकांना पटकन हार्ट अटॅक येण्याची असते शक्यता, काळजी घेणे गरजेचे
एका संशोधनात अशी माहिती समोर आली आहे की प्रत्येक रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक येण्याची शक्यतांमध्ये फरक आहे. सर्वात जास्त धोका कोणत्या रक्तगटाला आहे जाणून घ्या...

हृदयविकार ही आजच्या काळातील एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. हृदयविकाराचा झटका, उच्च कोलेस्टेरॉल, मधुमेह यांसारख्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हृदयविकाराचा झटका येण्यामागे रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होणे हे प्रमुख कारण आहे. सामान्यपणे, रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने रक्तप्रवाहात व्यत्यय येतो, पण हे एकमेव कारण नाही.
तणाव, खराब जीवनशैली, चिंता यांसारखी इतर कारणेही याला जबाबदार असतात. हृदयविकार हे जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. तुम्हाला हृदयविकाराचा धोका आहे की नाही? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हृदयविकाराची लक्षणे किंवा माहिती नीट समजली नसल्यास ते धोकादायक ठरू शकते. विशेष म्हणजे, तुमच्या रक्तगटाचा हृदयाच्या आरोग्याशी थेट संबंध असतो, हे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल.
वाचा: कोलेस्ट्रॉलची ‘ही’ लक्षणे जाणवतायेत? गोळ्या न घेता घरच्या घरी करा रामबाण उपाय
एका संशोधनानुसार, ‘ओ’ रक्तगट नसलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका अधिक
संशोधकांनी रक्तगटामुळे हृदयविकाराचा धोका कसा वाढतो, याचा शोध घेतला आहे. एका अभ्यासात असे दिसून आले की, A किंवा B रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता O रक्तगटाच्या व्यक्तींपेक्षा ८ टक्के जास्त आहे.
कोणाला आहे अधिक धोका?
संशोधकांनी A आणि B रक्तगटांची तुलना केली असता, B रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा सर्वाधिक धोका असल्याचे आढळले. अभ्यासानुसार, B रक्तगट असलेल्या व्यक्तींना O रक्तगटाच्या तुलनेत मायोकार्डियल इन्फेक्शन (हृदयविकाराचा झटका) चा धोका जास्त आहे. A रक्तगट असलेल्या व्यक्तींना O रक्तगटाच्या तुलनेत हृदय अपयशाचा धोका ११ टक्के अधिक आहे. हृदयविकाराचा झटका हा हळूहळू विकसित होतो, त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.
या रक्तगटांना आहे सर्वाधिक जोखीम
रक्तगट आणि हृदयविकाराचा झटका यांच्यातील संबंधावर यापूर्वीही अनेक संशोधने झाली आहेत. हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या एका अभ्यासात असे समोर आले की, A, B आणि AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका आहे. यापैकी AB रक्तगट सर्वाधिक जोखमीचा आहे. AB रक्तगट असलेल्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका २३ टक्के अधिक आहे, B रक्तगट असलेल्यांना ११ टक्के आणि A रक्तगट असलेल्यांना ५ टक्के अधिक धोका आहे.
