वर्किंग पेरेंट्समुळे मुलांकडे दुर्लक्ष होतंय? या 5 स्मार्ट टिप्समुळे मुलांची योग्य काळजी घ्या!
वर्किंग पेरेंट्ससाठी वेळेचं व्यवस्थापन हे मोठं आव्हान असलं, तरी योग्य नियोजन आणि संवादाच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकता. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे क्षण तुमच्यासोबत असावेत, यासाठी हे 5 उपाय नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये पालकांची कामं वाढली आहेत. दोघंही वर्किंग असल्याने मुलांच्या संगोपनासाठी वेळ देणं कठीण झालं आहे. याचा परिणाम त्यांच्या वाढीवर, स्वभावावर आणि संस्कारांवर होऊ शकतो. अनेकदा आई-वडिलांच्या अनुपस्थितीत मुलं चुकीच्या गोष्टींकडे वळतात. त्यामुळे वर्किंग पेरेंट्सने काही खास गोष्टी लक्षात ठेवूनच मुलांची काळजी घेणं आवश्यक आहे.
1. मुलांना आजी-आजोबांच्या सहवासात ठेवा
मुलांना पूर्णवेळ एकटं ठेवणं टाळा. शक्य असल्यास त्यांना आजी-आजोबांसोबत ठेवा. त्यामुळे ते सुरक्षितही राहतील आणि त्यांना चांगले संस्कारही मिळतील. आजी-आजोबांबरोबर राहिल्यानं मुलं भावनिकदृष्ट्या मजबूत बनतात. ते आपल्या अनुभवांतून मुलांना खूप काही शिकवू शकतात.
2. मुलांसाठी ठराविक दिनक्रम ठरवा
जर तुम्ही ऑफिसला जात असताना मुलं घरातच असतील, तर त्यांच्यासाठी एक नियमित वेळापत्रक तयार करा. त्यात खाणं, अभ्यास, झोप, खेळ यांचा समावेश असावा. यामुळे मुलं शिस्तीत राहतील आणि वेळेचा योग्य उपयोग करतील. याशिवाय, त्यांच्या वस्तू नेहमी ठराविक जागी व्यवस्थित ठेवाव्यात जेणेकरून तुम्ही नसतानाही त्यांना अडचण येणार नाही. दररोज एक वेळ ठरवून त्यांच्याशी फोनवर संवाद साधणंही महत्त्वाचं आहे.
3. घरात CCTV कॅमेरा बसवा
पालकांनी घरात CCTV कॅमेरा बसवणं एक योग्य पाऊल ठरू शकतं. विशेषतः जेव्हा मुलं एकटीच असतात, तेव्हा त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा उपयुक्त ठरतो. त्याचा अॅक्सेस आई-वडील दोघांच्या मोबाईलमध्ये असावा. एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली, तर तुम्ही तत्काळ मदत करू शकता.
4. मुलांशी खुलं संवाद साधा
तुमचं वर्क शेड्यूल कितीही व्यस्त असलं तरी मुलांशी मनमोकळं बोलणं आवश्यक आहे. त्यांना तुमच्या व्यस्ततेचं कारण समजावून सांगा. मुलं आजकाल समजूतदार आहेत, त्यांना हे पटू शकतं. काम, मेहनत, आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव लहान वयातच झाल्यास ते भविष्यात अधिक जबाबदार होतात.
5. सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत वेळ घालवा
तुम्हाला सुट्टी मिळाल्यावर ती पूर्णपणे कुटुंबासाठी राखून ठेवा. मुलांसोबत फिरायला जा, घरातच खेळा, किंवा त्यांना बाहेर जेवायला घेऊन जा. या वेळात केवळ त्यांचं ऐका, त्यांना समजून घ्या. असा वेळ मुलांसाठी खूप मौल्यवान ठरतो आणि त्यांना तुमच्याशी एक भावनिक जोड मिळते.
