
गणेश चतुर्थी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण आहे. या 10 दिवसांच्या उत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची खास परंपरा आहे. मोदक हे बाप्पाचे सर्वात आवडते खाद्यपदार्थ मानले जातात. तुम्ही जर यंदा 10 दिवस बाप्पांना घरी आणले असेल, तर दररोज त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे मोदक अर्पण करून आनंद साजरा करू शकता. चला, तर मग जाणून घेऊया 10 दिवसांसाठी 10 वेगवेगळ्या मोदकांच्या खास रेसिपी.
1. उकडीचे मोदक : गणेश चतुर्थीच्या पहिल्या दिवशी बाप्पासाठी पारंपारिक उकडीचे मोदक बनवा. यासाठी, खोबरे आणि गुळाचे सारण तयार करून घ्या. बाहेरच्या आवरणासाठी, तांदळाचे पीठ गरम पाण्यात मळून घ्या. नंतर त्यात सारण भरून मोदकाचा आकार द्या आणि त्यांना १५ मिनिटे वाफेवर शिजवा.
2. तळलेले मोदक : उकडीच्या मोदकासारखेच सारण वापरून, हे मोदक तयार केले जातात. पण त्यांना वाफेवर शिजवण्याऐवजी, तुपात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या. हे मोदक खुसखुशीत लागतात.
3. रवा मोदक : रवा मोदक बनवण्यासाठी, रवा तुपावर चांगला भाजून घ्या. नंतर त्यात दूध आणि साखर मिसळून मिश्रण तयार करा. त्यात नारळाचे सारण भरून मोदक वळा.
4. काजू मोदक : हे मोदक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी, भाजलेल्या काजूची बारीक पावडर करा आणि त्यात मिल्क पावडर व थोडे दूध मिसळून मऊ गोळा तयार करा. या गोळ्याला साच्यात भरून मोदक बनवा.
5. ड्राय फ्रूट मोदक : सुकामेवा आवडत असल्यास, हे मोदक नक्की बनवा. बदाम, काजू, पिस्ते जाडसर वाटून घ्या आणि त्यात खजूर आणि थोडे खोबऱ्याचे मिश्रण घालून मोदक वळा. हे मोदक पौष्टिक आणि चविष्ट लागतात.
6. चॉकलेट मोदक : लहान मुलांसाठी खास चॉकलेट मोदक बनवा. वितळलेल्या चॉकलेटमध्ये नारळाचे किंवा बदामाचे मिश्रण घालून मोदक साच्यात भरा आणि सेट होण्यासाठी दोन तास फ्रीजमध्ये ठेवा.
7. मावा मोदक : हे मोदक खास आहेत. खोवा तुपावर परतून घ्या. त्यात वेलची पावडर आणि केशर मिसळा. मिश्रण थंड झाल्यावर मोदक वळा.
8. नारळाचे मोदक : कमी वेळात आणि कमी साहित्यात बनवता येणारे हे मोदक खूप चविष्ट लागतात. यासाठी नारळाचा किस तुपात हलकासा परतून घ्या. नंतर त्यात कंडेन्स्ड मिल्क घालून चांगले मिसळा. मिश्रण थंड झाल्यावर मोदक तयार करा.
9. पनीर मोदक : हे मोदक थोडे हटके आहेत. पनीर किसून त्यात गुळाची पावडर आणि वेलची घालून शिजवून घ्या. हे सारण तयार झाल्यावर तांदळाच्या पिठाच्या आवरणात भरून मोदक वळा.
10. चणा डाळीचे मोदक : तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असलेले हे मोदक बनवण्यासाठी, रात्रभर भिजवलेली चणा डाळ शिजवून घ्या आणि बारीक करून घ्या. नंतर ती डाळ गूळ आणि नारळाच्या किसासोबत तुपात परतून घ्या. हे मिश्रण तांदळाच्या पिठाच्या आवरणात भरून मोदक तयार करा.
या 10 दिवसांच्या गणेशोत्सवात बाप्पाला वेगवेगळ्या मोदकांचा नैवेद्य दाखवून सणाचा आनंद द्विगुणीत करा!