
वाढत्या उष्णतेच्या तापमानात शरीरात पाण्याची पातळी योग्य राखणे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांना डिहायड्रेशन समस्या सतावत असते. तर या दिवसांमध्ये डिहायड्रेशन टाळण्यासाठी नैसर्गिक आणि चविष्ट घरगूती थंड पेयांचे सेवन करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. आरोग्य तज्ज्ञ दररोज कैरीचं पन्ह हे आरोग्यदायी पेय पिण्याची शिफारस करतात. तसेच हे कैरीचं पन्ह बनवायलाही खूप सोपं आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण कैरीचं पन्हं पिण्याचे आरोग्यदायी फायदे आणि बनवण्याची पद्धत जाणून घेऊयात.
कडक ऊन आणि उष्ण हवामानात भरपूर द्रवपदार्थ प्यावे. तसेच वाढत्या तापमानात शरीर योग्य राहावे यासाठी कच्च्या आंब्यांपासून बनवलेले पारंपरिक आणि आरोग्यदायी पेय कैरीचं पन्हं पिणे हा एक उत्तम पर्याय आहे. हे पेय शरीराला थंडावा देऊन ताजेतवाने तर करतेच, शिवाय त्वरित ऊर्जादेखील देते.
कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यातील एक लोकप्रिय घरगुती पेय आहे. हे पेय शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. आयुर्वेदात याला नैसर्गिक शीतकारक मानले जाते.
डिहायड्रेशन टाळते: उन्हाळ्यात शरीरातून घाम येत असतो. त्यामुळे शरीरातील पाणी आणि सोडियम व पोटॅशियमसारखे इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. मात्र तुम्ही जर नियमित कैरीचं पन्हं प्यायलात तर शरीरातील हे घटक पुन्हा भरून काढण्यास मदत होते. ज्यामुळे थकवा कमी होतो आणि ऊर्जा टिकून राहते. कैरीचं पन्हं हे पाण्यापेक्षा एक उत्तम पर्याय आहे, कारण त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात.
पचनसंस्था मजबूत करते: कच्च्या आंब्यामधील आम्ल आणि फायबर पाचक एन्झाइम्सना सक्रिय करतात. या पेयात तुम्ही जर पुदिना आणि जिरे मिक्स केले तर त्यामुळे पोट फुगणे, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यात पोटाचे त्रास अनेकदा वाढतात. पण कैरीचं पन्हं प्यायल्याने यापासून त्वरित आराम मिळतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते: कैरीचं पन्हं व्हिटॅमिन सी ने समृद्ध असल्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते, संसर्ग आणि हंगामी आजारांपासून संरक्षण करते, तसेच शरीरातील उष्णता नियंत्रित करून उष्माघाताचा धोका कमी करते.
त्वचेसाठी फायदे: कैरीचं पन्हं नैसर्गिकरित्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास सोबतच त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्यातील व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी योगदान देतात.
इंस्टेंट एनर्जी बुस्टर म्हणून काम करते: कैरीचं पन्हं हे उन्हाळ्यात इंस्टेंट एनर्जी बुस्टर म्हणून काम करते, ज्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे येणारा थकवा आणि अशक्तपणा दूर होण्यास मदत होते. काही अभ्यासांनुसार आणि पारंपरिक ज्ञानानुसार हे पेय यकृताच्या आरोग्यास देखील मदत करते आणि माफक प्रमाणात सेवन केल्यास वजन नियंत्रणातही उपयुक्त ठरू शकते.
कैरीचं पन्हं बनवणे सोपे आहे. 2-3 कच्ची कैरी धुवून घ्या. आता या कैऱ्या पाण्यात शिजवून घ्या. थंड झाल्यावर कैरीची सालं काढून गर काढा. नंतर या गरात चवीनुसार साखर किंवा गूळ, एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा काळे मीठ, थोडे साधे मीठ आणि चिरलेली पुदिन्याची पाने एकत्र करून पेस्ट बनवा आणि एक ग्लास पाण्यात हा गर गरजेप्रमाणे मिक्स करा. अशाप्रकारे कैरीचं पन्हं पिण्यास तयार आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)