हिवाळ्यात ओठ फाटण्याची चिंता सोडा! घरीच बनवा हे 5 लिप बाम, कोरडेपणा होईल दूर
Homemade Lip Balm: हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे ओठ फाटणे, कोरडे पडणे आणि त्यांची त्वचा निघणे अशा समस्या जाणवू लागतात. अशावेळी महागडे लिप बाम वापरण्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून लिप बाम तयार करू शकता. घरी ५ सोपे लिप बाम कसे बनवायचे, जाणून घ्या.

चेहऱ्याच्या सौंदर्याकडे लक्ष देताना अनेकदा आपण ओठांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतो. हिवाळ्यात ओठांची त्वचा अधिक नाजूक आणि संवेदनशील बनते. थंड वारे, कमी आर्द्रता आणि शरीरातील पाण्याची कमतरता यामुळे ओठांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे ओठ कोरडे पडणे, भेगा पडणे आणि त्वचा निघणे अशा समस्या उद्भवतात. अशावेळी ओठांना नियमित मॉइश्चरायझ करणे गरजेचे असते. यासाठी बाजारातील लिप बामवर जास्त पैसे खर्च करण्याऐवजी घरच्या घरी नैसर्गिक घटकांपासून लिप बाम तयार करू शकता. चला तर जाणून घेऊया घरच्या घरी सोप्या पद्धतीने ५ प्रकारचे लिप बाम कसे बनवायचे.
शिया बटर आणि नारळाच्या तेलाचा लिप बाम
हा लिप बाम तयार करण्यासाठी एक चमचा एरंडेल तेल, एक चमचा शिया बटर आणि दोन चमचे नारळाचे तेल एकत्र घ्या. हे मिश्रण गरम पाण्याच्या वाफेवर ठेवून वितळवून घ्या. त्यानंतर त्यात थोडी बीटरूट पावडर आणि पाव चमचा ग्रेपफ्रूट एसेंशियल ऑइल घालून व्यवस्थित मिसळा. तयार मिश्रण एका छोट्या डबीत भरून थंड होऊ द्या. लिप बाम घट्ट झाल्यानंतर ओठांवर लावू शकता.
लिंबू आणि रास्पबेरी लिप बाम
हा लिप बाम बनवण्यासाठी दोन चमचे नारळाचे तेल गरम करून वितळवून घ्या. त्यात दोन चमचे रास्पबेरी जिलेटिन घालून चांगले मिसळा. हे मिश्रण पुन्हा साधारण १५ सेकंद गरम करा. नंतर त्यात लिंबाच्या एसेंशियल ऑइलचे तीन थेंब घालून सर्व साहित्य एकत्र करा. तयार मिश्रण एका छोट्या डबीत भरून थंड होण्यासाठी ठेवा.
चॉकलेट लिप बाम
हा लिप बाम तयार करण्यासाठी दोन चमचे ऑलिव्ह वॅक्स आणि एक चमचा नारळाचे तेल एकत्र करून वितळवून घ्या. त्यात एक चमचा कोको पावडर आणि एक चमचा जोजोबा ऑइल घालून व्यवस्थित मिसळा. त्यानंतर टी ट्री ऑइलचे काही थेंब टाका. सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर मिश्रण छोट्या डबीत किंवा लिप बामच्या ट्यूबमध्ये भरा आणि थंड होऊ द्या.
नारळाच्या तेलाचा लिप बाम
हा लिप बाम तयार करण्यासाठी नारळाचे तेल आणि पेट्रोलियम जेली समप्रमाणात घ्या. दोन्ही घटक एका भांड्यात एकत्र करून चांगले मिसळा. त्यानंतर हे मिश्रण एका छोट्या हवाबंद डबीत भरून साधारण ३० मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर ते वापरण्यास तयार होईल.
मधाचा लिप बाम
हा लिप बाम बनवण्यासाठी काही थेंब मध आणि थोडे ग्लिसरीन किंवा पेट्रोलियम जेली एकत्र करून घ्या. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून छोट्या डबीत साठवा. दुसरा पर्याय म्हणून मध मध्ये थोडे नारळाचे तेल मिसळूनही वापरता येते. तयार मिश्रण ओठांवर थोड्या प्रमाणात लावा.