
परफ्यूमचा वापर आज जवळपास प्रत्येक व्यक्ती करतो. दररोज ऑफिस, कॉलेज किंवा कुठल्याही इव्हेंटला जाताना आपण स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी आणि घामाची दुर्गंधी दूर करण्यासाठी परफ्यूम वापरतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, की परफ्यूम किती वेळ टिकेल हे कसं ठरवलं जातं? आणि परफ्यूमच्या बाटलीवर ‘EDT’, ‘EDP’, किंवा ‘EDC’ असे गूढ वाटणारे शब्द का लिहिलेले असतात?
परफ्यूम खरेदी करताना अनेकांना बाटलीवर लिहिलेले EDT, EDP किंवा EDC याचे अर्थ माहित नसतात. पण ही लघुरुपं म्हणजे परफ्यूमच्या सांद्रतेची (concentration) पातळी. म्हणजेच त्यात सुगंधी तेल (Fragrance Oil) किती प्रमाणात आहे, यावरून परफ्यूम किती वेळ टिकेल हे ठरते.
EDT म्हणजे काय?
Eau De Toilette (EDT) हा फ्रेंच शब्द असून यामध्ये 5 ते 15 टक्के पर्यंत फ्रेग्रेन्स ऑईल असतं. यामुळे हा परफ्यूम हलका आणि फ्रेश वाटणारा असतो. त्याची खुशबू 3 ते 5 तासांपर्यंत टिकते. त्यामुळे EDT चा वापर दररोज ऑफिस किंवा कॉलेजसाठी योग्य मानला जातो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये EDT हे एक उत्तम पर्याय ठरतो.
EDP म्हणजे काय?
Eau De Parfum (EDP) हे परफ्यूम तुलनेने अधिक प्रबल असते. यामध्ये 15 ते 20 टक्के फ्रेग्रेन्स ऑईल असतं. त्यामुळे त्याचा सुगंध अधिक वेळ टिकतो जवळपास 6 ते 8 तासांपर्यंत. ईडीपी परफ्यूम विशेष प्रसंग, पार्टी किंवा नाईट आउटसाठी खूपच योग्य मानलं जातं.
EDC म्हणजे काय?
Eau De Cologne (EDC) हा परफ्यूम खूपच हलका असतो. यामध्ये केवळ 2 ते 5 टक्के फ्रेग्रेन्स ऑईल असते. त्यामुळे त्याचा सुगंध लवकरच निघून जातो. EDC चा वापर तुम्ही दररोज करू शकता, पण त्यासाठी दिवसातून २-३ वेळा ते पुन्हा लावण्याची गरज असते. याची किंमत तुलनेने कमी असते, त्यामुळे तो एक बजेट-फ्रेंडली पर्याय आहे.
परफ्यूम खरेदी करताना काय लक्षात घ्यावं?
जर तुम्ही दिवसभर टिकणारा परफ्यूम शोधत असाल तर EDP निवडा. ऑफिससाठी EDT एक चांगला पर्याय आहे, तर स्वस्तात परफ्यूम हवा असेल आणि तुम्ही वारंवार लावण्यास तयार असाल, तर EDC देखील चालेल. पण प्रत्येक वेळी बाटलीवर लिहिलेलं EDT, EDP किंवा EDC वाचणं आणि त्याचा अर्थ समजून घेणं हे तुमच्या खरेदीसाठी फार उपयोगी ठरू शकतं.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. )