
भारताची धार्मिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा उत्तराखंड राज्य अनेक कारणांनी प्रसिद्ध आहे. याच राज्यातील ‘माणा’ हे गाव विशेष ओळख मिळवतं कारण हे भारताचं शेवटचं नव्हे, तर पहिलं गाव मानलं जातं. बद्रीनाथ धामाजवळ वसलेलं हे छोटंसं पण ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध गाव केवळ सौंदर्याचं नव्हे तर धार्मिक महत्त्वाचंही केंद्र आहे.
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात तिबेट सीमेलगत वसलेलं ‘माणा’ गाव हे भारताच्या उत्तर टोकावर वसलेलं शेवटचं गाव असलं तरी लोकपरंपरेनुसार यालाच भारताचं “पहिलं” गाव मानलं जातं. बद्रीनाथ मंदिरापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव पौराणिक कथा, सांस्कृतिक इतिहास आणि निसर्गसंपन्नतेनं नटलेलं आहे. या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथेच सरस्वती नदीचा उगम पाहायला मिळतो भारतातील इतर कोणत्याही भागात सरस्वतीचं अस्तित्व प्रत्यक्षात दिसत नाही.
माणा गावाचं नाव मणिभद्र देव यांच्या नावावरून पडलं आहे. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार, ही भूमी चारधामांपेक्षाही पवित्र मानली जाते. असेही मानले जाते की, हे गाव शापमुक्त आणि पापमुक्त आहे. महाभारतातील पांडवांनी स्वर्गारोहणाच्या वेळी याच मार्गाचा वापर केला होता, अशी आख्यायिका आहे. गावाजवळच ‘भीम पुल’ नावाचा एक दगडी पूल आहे, जो भीमाने एका मोठ्या दगडाच्या सहाय्याने बनवल्याची कथा सांगितली जाते.
माणा हे केवळ धार्मिक स्थळ नसून ते हिमालय पर्वतरांगांनी वेढलेलं एक अत्यंत नयनरम्य ठिकाण आहे. निसर्गप्रेमींना इथे विविध सौंदर्यस्थळांचा अनुभव घेता येतो. यामध्ये वसुंधरा धबधबा, व्यास गुहा, तप्त कुंड, आणि मुख्य आकर्षण असलेली सरस्वती नदी हे मुख्य ठिकाणं आहेत.
नैसर्गिक सौंदर्य आणि धार्मिक महत्त्व याचा सुरेख संगम असलेलं माणा गाव हे पर्यटकांसाठी एक अनोखा अनुभव ठरतो. भारताच्या सीमेलगत असलेलं हे गाव आजही आपली सांस्कृतिक परंपरा जपतं. सण, उत्सव, पारंपरिक वास्तुकला आणि लोकसंस्कृती यामध्ये या गावाचं वेगळेपण उठून दिसतं.
जर तुम्ही एकदा तरी भारताचं खरं सांस्कृतिक आणि धार्मिक दर्शन घ्यायचं ठरवलं असेल, तर माणा गावाची सफर तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. हे गाव म्हणजे इतिहास, निसर्ग आणि श्रद्धेचं प्रतीक आहे, जे तुमच्या प्रवासाच्या यादीत नक्कीच असायला हवं.