Corn Kebab: थंडीच्या दिवसात चहाची मजा दुप्पट करतील कॉर्न कबाब, कमी साहित्यात झटपट तयार करा ही रेसिपी
Winter Snacks Recipe: हिवाळ्यात गरमागरम चहासोबत काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल, तर कॉर्न कबाब हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जाणून घ्या, मक्याचे चविष्ट कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.

हिवाळा असो किंवा पावसाळा, स्वीट कॉर्न किंवा मका खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. विशेषतः थंडीच्या दिवसांत गरमागरम भाजलेला मका, त्यावर लिंबाचा रस आणि मसाल्याची भुरभुर घालून खाण्याची मजा अनेकांना आवडते. मात्र, दरवेळी तोच भाजलेला मका खाण्याऐवजी यंदाच्या हिवाळ्यात काहीतरी हटके करून पाहा. मक्याच्या दाण्यांपासून तयार केलेले कुरकुरीत आणि चविष्ट कॉर्न कबाब संध्याकाळच्या नाश्त्याची रंगत वाढवतील. गरमा गरम चहासोबत खाण्यासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांना स्टार्टर म्हणून सर्व्ह करण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे. विशेष म्हणजे, हे कबाब बनवण्यासाठी फार साहित्य लागत नाही आणि ते कमी वेळात तयारही होतात. चला तर मग, या हिवाळ्यातील थंडगार संध्याकाळ अधिक चविष्ट करण्यासाठी जाणून घेऊया कॉर्न कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.
कॉर्न कबाब बनवण्यासाठी आवश्यक साहित्य
– मका – २
– उकडलेले बटाटे – २
– ब्रेड – ४ स्लाइस
– बारीक चिरलेला कांदे – १
– बारीक चिरलेली पुदिन्याची पाने
– बारीक चिरलेली हिरवी मिरची – २
– बटर – १ टीस्पून
– गरम मसाला – १ टीस्पून
– काळी मिरी पावडर – १/२ टीस्पून
– तेल – २ चमचे
– मीठ – चवीनुसार
कॉर्न कबाब बनवण्याची पद्धत
कॉर्न कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम मक्याचे दाणे आणि उकडलेले बटाटे एका बाऊलमध्ये घेऊन चांगले मॅश करा. त्यात ब्रेडचा चुरा, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, पुदिन्याची पाने, मीठ आणि इतर मसाले घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करा.
आता तयार मिश्रणाचे समान आकाराचे भाग करून त्यांना कबाबचा आकार द्या आणि स्कीवरवर लावा. दरम्यान, ओव्हन १८० डिग्री सेल्सिअस तापमानावर प्रीहीट करून घ्या. स्कीवरवर लावलेल्या कबाबला ब्रशच्या मदतीने थोडे बटर लावा. त्यानंतर हे कबाब प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये साधारण १५ ते २० मिनिटे बेक करण्यासाठी ठेवा. कबाब एका बाजूने सोनेरी रंगाचे होऊ लागल्यावर ते उलटवा. दर ५ ते ६ मिनिटांनी कबाब फिरवत राहा, जेणेकरून ते चारही बाजूंनी व्यवस्थित बेक होतील आणि बाहेरून कुरकुरीत होतील. कबाब छान सोनेरी रंगाचे झाल्यावर ओव्हनमधून बाहेर काढा. अशा प्रकारे तुमचे चविष्ट आणि कुरकुरीत कॉर्न कबाब तयार होतील. हे गरमागरम कबाब हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.