
नागपूर जिल्ह्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. खेळता खेळता थकलेला 4 वर्षीय चिमुकला रात्रभर शाळेत कोंडला गेला. महिला कर्मचाऱ्यांनी शाळेची खोली न तपासात बंद केली, चिमुकला वर्गाच्या मागच्या बाजूने झोपला असल्याने ही बाब लक्षात आली नाही. संध्याकाळी 5:30 वाजून गेल्यावरही चिमुकला परत न आल्याने पालकांनी खापरखेडा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला.
नेमकं काय घडलं?
बुधवारी नागपूरमध्ये शाळेतील महिला कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे धक्कादायक प्रकार घडला. खेळता खेळता थकलेला चार वर्षीय चिमुकला रात्रभर शाळेत कोंडला गेला. रात्रभर ना जेवन, ना पाणी, चारंही बाजूनं काळोख अशा स्थितीत चार वर्षांचा हिमांशु रात्रभर शाळेत होता. तो न घाबरता शाळेत बसून राहिला. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजी पणामुळे हे घडल्याचे कुटुंबियांनी सांगितले.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी 7 वेगवेगळे पथक नेमून रात्रभर मुलाचा शोध घेतला मात्र आढळून आला नाही. अखेरचा पर्याय म्हणून जेव्हा सकाळी शाळेची तपासणी केली तेव्हा मुलगा सुखरूप शाळेत आढळुन आला. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे घडली मोठी घटना, मात्र मुलगा सुखरूप आढल्याने नातवाईकांसह पोलिसांचा जीव भांड्यात पडला. बुधवारी रात्री हा मुलगा शाळेत कोंडला गेला, दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल सकाळी आढळून आला.
कुटुंबियांनी दिली प्रतिक्रिया
“दुपारी हिमांशु खेळत होता, सायंकाळी सहापर्यंत तो खेळत होता. नंतर दिसतंच नव्हता. आम्ही घाबरून गेलो. मग पोलीस तक्रार केली. पोलीसांनी आणि आम्ही रात्रभर शोधलं. आम्ही घाबरुन गेलो होतो, रात्रभर बाहेर शोधत फिरलो. शेवटी दुसऱ्या दिवशी ११ वाजता तो शाळेत सापडला. तो सांगतो रात्रभर शाळेत पाणी आणि जेवण नव्हतं. पण रात्रभर रडला नाही” असे हिमांशूच्या आई-वडीलांनी सांगितले.