Ajit Pawar Plane Crash: अजित दादांचा तो कॉल ठरला शेवटचा, विमानात बसण्यापूर्वी पत्नीला दिला होता सल्ला
Ajit Pawar: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातापूर्वी शेवटचा फोन पत्नी सुनेत्रा पवारांना होता. सकाळी पत्नीशी बोलताना त्यांनी सुनेत्रा पवार यांना खास सल्ला दिला होता. आता ते नेमकं काय म्हणाले होते चला जाणून घेऊया...

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे बुधवारी (२८ जानेवारी २०२६) एका भीषण विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ लँडिंगदरम्यान झालेल्या या अपघातात अजित पवारांसह विमानातील एकूण पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. काल बारामतीतील विद्या प्रतिष्ठान महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण बारामती शहर शोकाकुल झाले असून, राज्यभरातील नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने अंत्यविधीला उपस्थित राहिले.
अपघातापूर्वीचा शेवटचा फोन कॉल
अजित पवारांच्या निधनानंतर आता त्यांच्या शेवटच्या क्षणांबाबत नवीन माहिती समोर येत आहे. अपघाताच्या दिवशी सकाळी नाश्ता करत असताना अजित पवार यांनी पत्नी आणि खासदार सुनेत्रा पवार यांना फोन केला होता. हा फोन कॉल त्यांच्या आयुष्यातील ‘अखेरचा’ ठरला. देवगिरी बंगल्यावर नाश्ता करताना झालेल्या या संवादात दोघांमध्ये संसदेतील बजेट सत्र आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा झाली. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांना खास सल्ला दिला होता, “राष्ट्रपतींचे अभिभाषण लक्ष देऊन ऐक.” हा सल्ला त्यांनी आपल्या पत्नीला, जी खासदार म्हणून संसदेत कार्यरत आहेत, त्या संदर्भात दिला होता. या वेळी अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पीए आणि सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.
नंतरची घटनाक्रम
नाश्ता आटोपल्यानंतर अजित पवार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी देवगिरी बंगल्यावरून मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. सुरुवातीला सुरक्षा कर्मचारी आणि पीएसोबत असले तरी विमानतळावर पोहोचल्यानंतर ते सर्व परतले. अजित पवार हे आपले वैयक्तिक सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांना घेऊन स्पेशल चार्टर विमानाने (लियरजेट-४५ XR) बारामतीकडे निघाले. बारामती विमानतळावर लँडिंग करताना सकाळी सुमारे ८:४४-८:४५ वाजता विमान धावपट्टीजवळच नियंत्रण सुटले, जमिनीला धडकले आणि आग लागली. या अपघातात अजित पवार, सुरक्षा रक्षक विदीप जाधव, दोन क्रू मेंबर्स (पायलट आणि सह-पायलट) यांच्यासह सर्वांचा मृत्यू झाला. अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड, कमी दृश्यमानता किंवा इतर घटक असू शकतात; ब्लॅक बॉक्स तपासातून हे स्पष्ट होणार आहे.
बारामतीत चार सभांचे आयोजन
अजित पवार बारामतीत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी चार जाहीर सभांना हजेरी लावणार होते. त्यामुळे ते लवकर सकाळीच निघाले होते. दुर्दैवाने हा प्रवास त्यांच्या शेवटचा ठरला. अजित पवारांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य सरकारने तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. अंत्यसंस्काराला मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहिले आणि ‘अजितदादा’ यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहली.
