Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल 14 हजार पुरुषांनीही घेतला असल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांवर कारवाई होणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
aditi tatkare
| Updated on: Jul 29, 2025 | 4:17 PM

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ तब्बल 14 हजार पुरुषांनीही घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी भाष्य केले आहे. कारवाईबाबत आदिती तटकरे यांनी नेमकं काय म्हटलं ते सविस्तर जाणून घेऊयात.

आदिती तटकरेंनी म्हटले की, लाडकी बहिण योजनेमुळे अनेक महिलांना आनंदाचे क्षण मिळाले. विरोधकांना मात्र ही योजना खुपत आहे. आम्ही वेळोवेळी माहिती देत आलो आहोत. काही गोष्टींबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 28 जूनला योजनेची घोषणा करण्यात आली होती, 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यावेळी काही पुरुषांनीही अर्ज भरल्याचे समोर आले आहे.

पुढे बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘योजनेत सातत्याने छानणी केली जात आहे. महिला व बालविकास विभाग इतर विभागांचा डेटा ॲक्सिस करु शकत नाही. आम्हाला जानेवारीत कृषी विभागाचा डेटा उपलब्ध झाला, त्यातून काही महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत होत्या असं समोर आलं. त्या महिलांची छानणी सुरु आहे.’

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या पुरुषांबाबत बोलताना तटकरे म्हणाल्या की, ‘ज्या महिलेचे अकाऊंट नव्हते, त्यावेळी त्यांनी पुरुषांचे अकाऊंट दिले का? हा एक प्रश्न आहे. अर्जांच्या छावणीतून हे समोर येईल. खरंच पुरुषांनी भरले आहेत का? बँकेत महिलेचे खाते नसेल त्यामुळे अर्ज भरलेला असू शकतो, मात्र तपासणी झाल्याशिवाय आम्ही काहीही सांगू शकत नाही. याआधी अपात्र महिलांनी अर्ज केले होते, मात्र त्यांच्यावर कारवाई करत त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.’

कारवाईबाबत बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, ‘मी वारंवार सांगितलं ज्यांनी चुकीचा लाभ घेतला असेल तर कारवाई करु. एका व्यक्तीने 30-35 अकाऊंट जोडले होते, मात्र ते अकाऊंट आम्ही सील केले आहेत. कोणी अपात्र राहता कामा नये यासाठी हे आमचे प्रयत्न आहे.’ याचाच अर्थ जर पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतला असेल. त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.