Aaditya Thackeray : 15 लाख जणांच्या नोकऱ्या जाणार, अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत; आदित्य ठाकरेंच्या आकडेवारीने राजकारणात वादळ
हिंजवडी आयटी पार्कशी संबंधित 15 लाख लोकांच्या जाणार असल्याचा दावा ठाकरेंनी केला आहे. ठाकरेंच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

माजी मंत्री आदित्य ठाकरे हे राज्यातील विविध शहर, जिल्ह्यांना भेटी देत आहेत. चाकण दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनी पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कची देखील पाहणी केली. या पाहणीनंतर आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना धक्कादायक दावा केला. हिंजवडी आयटी पार्कमधील 15 लाख जणांच्या नोकऱ्या जाणार असल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी याच्या आकडेवारीने एकच खळबळ उडाली आहे. सरकारने लक्ष देऊन लोकांच्या नोकऱ्या वाचवल्या पाहिजे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
अनेकांच्या नोकरीवर गदा येणार, ठाकरेंचा दावा
आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, ‘अनेक कंपन्या महाराष्ट्र सोडण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जाण्याच्या तयारीत आहे. या कंपन्यांना मूलभूत सुविधा मिळत नाही. रस्ते, पाण्याच्या समस्या आहेत. वीजेची समस्या आहे. हिंजवडीमधून अनेक मेसेज आले. हिंजवडीमध्ये मोठं आयटी पार्क आहे. या आयटी पार्कवर जवळपास साडेसहा लोक थेट अवलंबून आहेत. तसेच जवळपास 15 लाख लोकांना अप्रत्यक्षरित्या या भागातून रोजगार मिळतो. या भागात वाहतूक कोंडी वाढत आहे, असे मागील तीन वर्षांपासून ऐकत आहे. समस्या सोडवल्याने लोकांची जीवनशैली सुधारेल’.
…तरच नोकऱ्या वाचतील, असे ठाकरे म्हणाले
‘स्थानिक, ग्रामस्थ, नोकरदारांकडून समस्या समजून घेत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर फुटपाथ नाही. मेट्रो चालू नाही. दोन-तीन महिन्यांपासून मेट्रो सुरू नाही. त्याच्या उद्घाटनाची तारीख मिळेना झाली आहे. ही गोष्ट म्हणजे पाइपगॅस सर्वच इमारतीत नाही. कचऱ्याची समस्या आहे. इथे कोणी लक्ष देत नाही. काही चौकात PWD, PMRDA, PCM या तिन्ही संस्थेचे रस्ते आहेत. असा गोंधळ पाहायला मिळत आहे. मागील तीन चार वर्षांत नवीन कंपन्या आलेल्या नाहीत. आताच्या कंपन्या विचार करत आहे की, फेज तीनमधून फेज एक मध्ये जाण्यासाठी एक- दीड तास लागत आहे. हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. काही संघटना मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांना भेटल्या. अनेक मदत मागत असतात. वाहतूक कोंडीची समस्या आहे. वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्याची गरज आहे. सिग्नल आहे. स्मार्ट सिग्नल हवेत. रस्ते व्यवस्थित नाही. तीन-चार गोष्टींवर लक्ष केंद्रीत केलं तर मोठा दिलासा मिळू शकतो. काही मुद्दांवार काम केल्यास राज्य सरकार नोकऱ्या वाचवू शकते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.