
आम्हाला देशातून बाहेर काढा, पण खरा मुसलमान कधीच वंदे मातरम गाणार नाही. मी ‘वंदे मातरम’चा सन्मान करतो. मात्र माझा धर्म मला वंदे मातरम म्हणण्याची परवानगी देत नाही. मग कारवाई करा, किंवा जेलमध्ये टाका, असे वादग्रस्त विधान समाजवादी पक्षाचे नेते आणि आमदार अबू आझमी यांनी केले होते. यावरुन मोठा वाद पेटला आहे. त्यातच आता भाजप नेते आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी अबू आझमी यांच्या विधानावर जोरदार टीका केली आहे. जर कुराण वाचण्याची सक्ती केली जात असेल, तर त्यांनी पाकिस्तानात जावे असा इशारा मंगलप्रभात लोढा यांनी दिला.
मंगलप्रभात लोढा यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अबू आझमी यांच्या कुराण सक्तीच्या मुद्द्यावर थेट भाष्य केले. जर कुराण वाचण्याची सक्ती करायची असेल तर अबू आझमी यांनी पाकिस्तानात जावे. इथं गीता वाचा, रामायण वाचा. ही अहिल्यादेवींची भूमी आहे. जे वंदे मातरमला विरोध करतात ते देशद्रोही आहेत, असे मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले.
त्यासोबतच मंगलप्रभात लोढा यांनी अबू आझमी यांच्या वंदे मातरम विरोधावरही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अबू आझमी यांनी वंदे मातरम गीताला विरोध करून कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचा अपमान केला आहे. त्यांच्या वक्तव्यात विघटनवादी प्रवृत्ती दिसून येत असल्याचा आरोप लोढा यांनी केला आहे. त्यांनी आझमी यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
तसेच वंदे मातरमला विरोध करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने आदेश देऊन हे गीत गाण्याचे कार्यक्रम घेण्यास सांगितले आहे. तसेच विरोधकांना आव्हान देत लोढा यांनी अबू आझमींच्या घरासमोर आणि ‘वंदे मातरम’ला विरोध करणाऱ्यांच्या घरासमोर हे गीत गाण्याचे आवाहन केले आहे.
त्यासोबतच मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईतील अनधिकृत बांधकामांवरून जोरदार निशाणा साधला. त्यांनी विशेषतः मालाडमधील २२,२५८ अनधिकृत बांधकामांचा उल्लेख केला. ही बांधकामे एका विशिष्ट जातीची असल्याचा गंभीर आरोप केला. हा विषय राजकारणाचा नसून, लांगुलचालन कशासाठी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंबईचे बंगाल होऊ द्यायचे नाही, अशी कठोर भूमिका घेत, या अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच जैन मुनींच्या आंदोलनासंदर्भात बोलताना लोढा यांनी न्यायालयाचा आदेश महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सरकार हे कोर्टाच्या आदेशानुसार पुढे जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही बाजूंना एकत्र आणून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. जैन मुनींप्रति आदर असला तरी, त्यांच्या विशिष्ट भूमिकेशी आपण सहमत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.