
नांदेडच्या आचल मामीलवाड हिने प्रियकर सक्षम ताटे याच्या मृतदेहासोबत लग्न केले. आचल मामीलवाड हिच्या वडिलांनी आणि भावाने तीन गोळ्या झाडून सक्षमची हत्या केली. गोळ्या लागल्यानंतरही सक्षम पळत होता, त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घातली आणि त्याचा जीव घेतला. सक्षमला गोड बोलून भाऊ आणि वडिल घेऊन गेल्याची कल्पना आचलला होती. सोशल मीडियावरून मेसेजमुळे सक्षम आणि आचल यांच्या प्रेमसंबंधांबद्दल आचलच्या कुटुंबियांना कुणकुण लागली होती. सक्षमला आचलपासून दूर राहण्याचा सल्ला तिच्या भावाने दिला होता. मात्र, तरीही आचल आणि सक्षम ऐकण्यास तयार नव्हते.
सक्षम ताटे अवघ्या 20 वर्षाचा होता. मात्र, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. हेच नाही तर आचल मामीलवाड हिच्याही कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. सक्षमच्या हत्येबद्दल कळताच आचल मामीलवाड हिने त्याच्या घरी धाव घेतली आणि त्याच्या हाताने आपल्या शरीरावर हळद लावून घेतली आणि त्यालाही हळद लावली. तिने सक्षमच्या मृतदेहासोबत लग्न केले. यावेळी तिने आपल्या कुटुंबियांवरून अत्यंत गंभीर आरोप केले.
माझ्या भावाला आणि वडिलांना फाशीचीच शिक्षा द्या, असेही तिने रडत रडत म्हटले. सक्षम मरूनही जिंकला आणि ते हरले. आयुष्यभर सक्षमची बायको म्हणूनच मी राहणार. यादरम्यान आचल मामीलवाड हिने सांगितले की, माझ्या घरच्यांना माझे आणि सक्षमचे संबंध मान्य नव्हते. मी आणि सक्षम गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंधांमध्ये होतो. सक्षम हा जेलमधून सुटून आल्यानंतर त्याची हत्या करायची हा कट माझ्या कुटुंबियांकडून रचला जात होता.
त्यांनी मलाही धमकी दिली होती. सक्षम नसला तरीही मी त्याच्याच घरी आता आयुष्यभर त्याची बायको म्हणून राहणार आहे. सक्षम ताटे याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर त्याच्यावर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती. तो काही दिवसांपूर्वी जेलमधून बाहेर आला होता. सक्षम आणि आचल यांना लग्न देखील करायचे होते. मात्र, त्यापूर्वीच आचलच्या वडिलांनी, भावाने आणि अजून काही लोकांनी मिळून सक्षमची हत्या केली.