प्रधान यांच्यानंतर अभिजीत दिपकेंकडून आणखी एका राजीनाम्याची मागणी , मोठ्या आंदोलनाची घोषणा, सरकारचं टेन्शन वाढलं
काही दिवसांपूर्वी देशभरात नीटी परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दिपके संस्थापक असलेल्या काँकरोच जनता पार्टीच्या वतीने मोठं आंदोलन करण्यात आलं.

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतरवर मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं, संसदेवर मोर्चा देखील काढण्यात आला. अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान त्यानंतर आता अभिजीत दिपके यांनी एमपीएससी परीक्षेमध्ये सुरू असलेल्या गोंधळावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवाचा राजीनामा झाला पाहिजे, अशी मागणी एका विद्यार्थिनीने केली. यावर बोलताना अभिजीत दिपके यांच्याकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.
नेमकं काय म्हणाले दिपके?
तुम्ही जेवढं जास्त सिरीयस व्हाल तेवढे तुम्ही खचून जाल. जितकं जास्त बोलाल तेवढं जास्त तुमचं बॉण्डिंग वाढेल. हे लोक सिरीयसपणे देश चालवत आहे का? असं तुम्हाला वाटतंय का? आम्हाला रस्त्यावर उतरण्याची वेळ येणार नाही, राजीनामा असाच होणार आहे. आपल्याला किमान आठवडाभर बसावं लागेल. जोपर्यंत राजीनामा होत नाही तोपर्यंत, आता उठायचं नाही आपल्याला आंदोलनाला बसावं लागणार आहे. या सरकारसोबत लढणं बरोबर नाही, या सरकारला लोकशाही समजत नाही.
15 ते 20 लाख विद्यार्थी एकत्र आले तर राजीनामा झाल्याशिवाय राहणार नाही, आता राजीनामा नाहीतर सरकारच बदलेल. आपल्याला त्यासाठी कदाचित लाठ्या-काठ्या देखील खाव्या लागतील. आठ कोटीमधलं जर दीड कोटी मतदान पडलं नाही, तर आज जे भीमनवार यांना वाचवत आहेत, त्यांनाच कोणी वाचवण्यासाठी येणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांचा ज्या पद्धतीने राजीनामा झाला त्याच पद्धतीने हा देखील राजीनामा होईल असं यावेळी दिपके यांनी म्हटलं आहे.
दरम्यान आंदोलनाला एकदा बसलं की उठायचं नाही, जर आता पेपर फुटला तर त्यांची खुर्ची राहिली नाही पाहिजे. उत्तर प्रदेशचे बाबा आधी हिंदू मुस्लिम करायचे, मात्र आता शाळा ठीक करण्यासाठी बजेट मंजूर करत आहेत, असं म्हणत त्यांनी यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील टोला लगावला.