विखे पाटील हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला, 4 वर्षांनी गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

अहमदनगरमधील डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटलमधील ६ डॉक्टर्सवर कोरोना काळातील एका मृत्यू प्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

विखे पाटील हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या कृत्याने महाराष्ट्र हादरला, 4 वर्षांनी गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?
hospital covid
| Updated on: Oct 19, 2025 | 4:14 PM

अहमदनगर शहरातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली आहे. या ठिकाणी असेलल्या नामांकित डॉ. विखे पाटील मेमोरिअल हॉस्पीटलमधील पाच डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजिकल लॅबचे एक तज्ञ डॉक्टर अशा एकूण सहा वैद्यकीय व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहमदनगरमधील तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कोरोना काळात उपचारादरम्यान झालेल्या एका मृत्यू प्रकरणी ही धक्कादायक कारवाई करण्यात आली आहे.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार अशोक खोकराळे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वडिलांना १३ ऑगस्ट २०२० रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या उपचारादरम्यान त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. मात्र रुग्णालय प्रशासनाने ही माहिती अशोक खोकराळे आणि त्यांच्या कुटुंबियांपासून पूर्णपणे दडवून ठेवली. वडिलांचा मृत्यू झाल्यानंतरही कुटुंबाला याबाबत माहिती न दिल्यामुळे खोकराळे यांनी तेव्हापासूनच हॉस्पीटल प्रशासनाविरोधात सातत्याने न्यायालयीन पाठपुरावा सुरू ठेवला होता.

त्यांच्या चार वर्षांच्या अथक लढ्यानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दाखल झालेल्या या गुन्ह्यांमध्ये डॉक्टरांवर केवळ उपचारातील त्रुटींचे नव्हे, तर अत्यंत क्रूर आणि गंभीर स्वरूपाचे आरोप ठेवण्यात आले आहेत. रुग्णाची मर्जी नसताना त्याला ॲडमिट करून घेणे, तसेच रुग्णाला धोका होईल याची पूर्ण माहिती असतानासुद्धा जास्तीचा आणि अतिरिक्त औषधाचा डोस देऊन जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करणे. त्यासोबतच रुग्णांकडून अवाजवी आणि अवास्तव बिल रक्कमा आकारून त्यांची आर्थिक लुबाडणूक करणे, असा आरोप करण्यात आला आहे. तसेच मृत्यूनंतर शरीराच्या अवयवांची तस्करी करणे आणि हे सर्व गुन्हेगारी कृत्य लपवण्यासाठी व पुरावे नष्ठ करण्याच्या उद्देशाने प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे, असाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान अशोक खोकराळे यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये संबंधित डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले आहेत. अवयव तस्करी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे यासारख्या अत्यंत गंभीर आरोपांमुळे केवळ अहिल्यानगर नव्हे, तर संपूर्ण राज्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलीस आता सर्व आरोपांची सत्यता पडताळून पाहत आहेत. या प्रकरणातून वैद्यकीय क्षेत्रातील नैतिकतेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.