VIDEO: कारभारी लयभारी… मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा भारदस्त, अहमदनगरमध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

| Updated on: Feb 12, 2021 | 3:00 PM

गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. | sarpanch arrive in helicopter

VIDEO: कारभारी लयभारी... मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा भारदस्त, अहमदनगरमध्ये सरपंचाची हेलिकॉप्टरमधून एन्ट्री
Follow us on

अहमदनगर: हल्लीच्या काळात राजकारण्यांकडून निवडणुकीपासून ते शपथविधी अशा प्रत्येक सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन केले जाते. असाच एक सोहळा शुक्रवारी अहमदनगरच्या संगमनेर तालुक्यात पार पडला. तालुक्यातील आंबा दुमाला गावच्या सरपंचांनी हेलिकॉप्टरमधून एन्ट्री घेत पदाचा कार्यभार स्वीकारला. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. (Grand event in Sangamner Ambi dumala village)

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा शपथविधी सोहळा रंगला होता. सरपंचाचे हेलीकॉप्टरने आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आले आणि बारा बैलाच्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. गावातील उद्योजक तरूण जालींदर गागरे यांच्या पुणे येथे विविध कंपन्या आहेत. शेकडो तरूणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

जालिंदर गागरे पुण्यात राहत असले तरी त्यांची आपल्या गावाशी नाळ जोडलेली आहे. गावाचा सर्वांगीण विकास करण्याच्या ध्येयाने त्यांनी गावची निवडणूक लढवली आणि त्यांचे संपूर्ण पॅनल बहूमताने विजयी झाले. योगायोगाने सरपंचपद सर्वसाधारण पुरूषाचे निघाल्याने जालिंदर गागरे आज सर्वानुमते सरपंचपदी विराजमान झाले आहेत. गावचा विकास हेच ध्येय असल्याचं जालींदर गागरे यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीपेक्षा ग्रँड सोहळा

ज्या पद्धतीने मंत्री मुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडतो तशाच पद्धतीने आज ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच, उपसरपंच यांनी गावच्या विकासाची शपथ घेतली. ‘गावाकडे चला’ हा नारा गांधीजींनी दिला होता त्याच ध्येयाने मी गावात आलो असून आजचा सोहळा अविस्मरणीय व्हावा यासाठी हेलिकॉप्टरने आल्याचे जालींदर गागरे यांनी सांगितले.

गावचा विकास करण्याचा ध्यास असलेला सरपंच लाभल्याने आज गावही आनंदी आहे. अशाच पद्धतीने राज्यातील प्रत्येक गावातील सुशिक्षित उद्योजक जर पुढे आले तर गाव सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही, अशी भावना उपस्थित गावकऱ्यांनी व्यक्त केली.

दौंडमधील सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य आता सरपंचपदी, 21 वर्षीय स्नेहलची घोड्यावर मिरवणूक

पुण्याच्या दौंड तालुक्यातही 21 वर्षांच्या स्नेहल संजय काळभोर हिची सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर तिची गावातून घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून स्नेहल काळभोर खडकी ग्रामपंचायतीच्या सदस्यपदी पहिल्यांदा निवडून आली होती. आता बोनस म्हणजे तिच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरुण सरपंच होण्याचा मानही स्नेहल काळभोरला मिळाला आहे.

संबंधित बातम्या:

(Grand event in Sangamner Ambi dumala village)