
Ajit Pawar : सध्या राज्यत राजकीय घडामोडींना वेग आला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकीसांठी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल. दरम्यान आता प्रचार संपलेला असून सगळ्यांचे लक्ष मतदानाकडे लागले आहे. आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांनी मोठ्या सभांचा धडाका लावला होता. विशेष म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एकमेकांवर नेतेमंडळी सडकून टीका करताना दिसले. या सर्व महापालिकांच्या निवडणुकीत पुणे आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिका निवडणूक चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. या दोन्ही महापालिका जिंकण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण ताकद लावली असून आकर्षक आश्वासनं दिली आहेत. प्रचारादरम्यान अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर टीकादेखील केली आहे. असे असतानाच आता अजित पवार यांनी खळबळजनक विधान केले आहे. या विधानानंतर आता अजित पवार यांची कोंडी करण्याचा प्रयत्न तर केला जात नाहीये ना? असा सवाल उपस्थित केला जातोय.
अजित पवार पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. यावेळी बोलत असताना त्यांनी माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणला गेला, असा दावा अजित पवार यांनी केला. आज पहाटे पाच वाजता माझ्या सभेला परवानगी दिली. माझ्या सभेला परवानगी मिळू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणण्यात आला, असे म्हणत यांच्या काकाने अशी परवानगी दिली होती का? असा संतापजनक सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. तसेच लोकशाही आहे, मी सभा घेतो तर त्यांनी पण घ्यावी आणि माझ्या आरोपांना उत्तरं द्यावी, असे आव्हानही अजित पवार यांनी केले.
दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या आरोपानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? असा सवाल उपस्थित केला जातोय. अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या मतदारांना आकर्षक आश्वासनं दिली दिली आहेत. बस आणि मेट्रोमधील प्रवास महिलांना मोफत करू या आश्वासनाचाही त्यात समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र या आश्वासनाची खिल्ली उडवली आहे. प्रचारादरम्यान फडणवीस आणि अजित पवार यांनी एकमेकांवर अप्रत्यक्षपणे टीकाही केलेली आहे. असे असतानाच आता अजित पवार यांनी सभेला परवानगी मिळू नये म्हणून दबाव टाकला जात असल्याचे सांगितल्यानंतर खळबळ उडाली आहे.