अजित पवारांच्या निधनाचे वृत्त समजताच धनंजय मुंडे ढसाढसा रडले, प्रवासातील Video समोर
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनामुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित दादांच्या जाण्याने माझे पितृछत्र हरपले, अशा शब्दांत धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून संपूर्ण राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. अजित दादांच्या अकाली निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या धक्क्याने राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वच नेते कोलमडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना अजित पवारांच्या निधनामुळे अश्रू अनावर झाले आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा आधारस्तंभ हरपल्याच्या भावनेने धनंजय मुंडे यांना अश्रू अनावर झाले. वडिलांच्या निधनानंतर दादांनी मला कधीही वडील नाहीत, असं वाटू दिलं नाही, त्यांनी वडिलांची उणीव भरून काढली होती, असे शब्दांत धनंजय मुंडेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
प्रवासात गहिवरले
अजित पवार यांच्या अपघाताची बातमी समजताच धनंजय मुंडे तातडीने बीडहून बारामतीकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान त्यांच्या एका निकटवर्तीय सहकाऱ्याने त्यांना फोन केला. यावेळी धनंजय मुंडेंना आपला हुंदका आवरता आला नाही. गदगदलेल्या आवाजात त्यांनी केवळ इतकेच म्हटले की, “माझे वडील गेल्यानंतर दादांनी कधी वडील नाहीत याची जाणीव होऊ दिली नाही.” यावेळी धनंजय मुंडेंचा भावनांचा बांध फुटल्यामुळे सॉरी, मी नंतर बोलतो असे म्हणत त्यांनी फोन ठेवला. त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सर्वांचेच डोळे पाणावले.
राजकीय वर्तुळात अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे नाते मार्गदर्शक आणि शिष्य याच्या पलीकडचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत फळीत अजितदादांचा सर्वात लाडका कोण? असा प्रश्न अनेकदा चर्चेत असायचा. त्यावेळी अजित पवारांनी अनेकदा व्यासपीठांवरून धनंजय मुंडे असे नाव जाहीरपणे घेतले होते. मुंडेंच्या राजकीय संघर्षात दादा नेहमीच ढाल बनून उभे राहिले. तसेच अजित दादांच्या प्रत्येक निर्णयावर धनंजय मुंडेंनी विश्वास टाकला.
केवळ स्वकीयच नाही, तर विरोधकही अजितदादांच्या जाण्याने हळहळले आहेत. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी सोलापूरमध्ये बोलताना सांगितले की, “दादा हे केवळ सत्तेतील नेते नव्हते, तर ते कष्टकऱ्यांचे कैवारी होते. वैचारिक मतभेद असूनही त्यांनी बीडी कामगार, बेघर आणि झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक निर्णय घेतले.” तसेच लोकांमध्ये राहून काम करणारा असा धडाडीचा नेता अचानक निघून जाणे हा महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा धक्का आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या. अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक कार्यकर्ता आणि धडाडीचा प्रशासक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. बारामतीकडे राज्याच्या कानाकोपऱ्यातून समर्थक आणि नेते धाव घेत आहेत.
