
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. बुधवारी सकाळी बारामतीजवळ अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान लँडिंगवेळेस क्रॅश झालं आणि स्फोट होऊन पेट घेतला. यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तसेच या विमानात त्यांच्यासोबत असलेले अजितदादांचे अंगरक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. अजित पवार यांच्या या अकस्मात निधनाने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला. अख्खा महाराष्ट्रही अजित दादांच्या जाण्यामुळे हळहळला.
बुधवारी सकाळपासूनच बारामतीमध्ये अजित पवारांचे समर्थक, चाहते, तसेच बारामतीकर जनतेची प्रचंड गर्दी पहायला मिळाली. ज्या रुग्णालयात अजित दादांचं पार्थिव ठेवलं होत, त्याबाहेर लोकांचा अक्षरश: जनसमुदाय जमला होता. काल (गुरूवार) काटेवाडी येथे अजित दादांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. तिथेही हजारो लोकांनी येत दादांना अखेरचा निरोप दिला. त्यानंत विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात हजारोंच्या जनसमुदायासमोर अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. परत या परत या अजित दादा परत या.. एकच वादा अजित दादा, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. आपल्या लाडक्या नेत्याचे अंत्यसंस्कार पाहून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रूंना खळ नव्हता.
अजितदादांच्या निधनाचा धक्का सहन झाला नाही, समर्थकाचा तीव्र अटॅकने मृत्यू
दरम्यान अजित दादांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या समर्थकाचाही मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. अजित दादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने समर्थकाचे निधन झालं. मिळालेल्या माहितीनुसार सुदाम बोडके असे मृत समर्थकाचे नाव असून ते 63 वर्षांचे होते.
सुदाम बोडके हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून परिचित होते. ते दिंडोरी तालुक्यातील ढकांबे गावचे रहिवासी होते. बुधवारी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं. त्याच दिवशी सुदाम बोडके हे आपल्या एका मित्राच्या दशक्रिया विधीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना त्यांना अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळाली. ही बातमी समजताच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते अत्यंत अस्वस्थ झाले. प्रकृती खालावत असल्याने सुदाम बोडके यांनी तातडीने नाशिककडे हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते स्वतःच्या गाडीने रुग्णालयाकडे निघाले. मात्र हॉस्पिटलच्या पायऱ्या चढत असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सुदाम बोडके हे अजित दादांचे कट्टर कार्यकर्ते आणि चहते म्हणून संपूर्ण परिसरात परिचित होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे गावातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली शाखा सुदाम बोडके यांनीच सुरू केली होती. सुदाम बोडके यांच्या अचानक निधनामुळे ढकांबे गावासह दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे.