अजितदादांनी दिलेला शेवटचा शब्द…. सुनेत्रा वहिनींनी पाळला, कट्टर आमदाराची इच्छा पूर्ण

अजित पवार यांच्या निधनानंतरही त्यांनी आमदार शेखर निकम यांना दिलेला शब्द सुनेत्रा पवार यांनी पाळला आहे. चिपळूणमधील या विवाह सोहळ्याला उपस्थित राहून पवार कुटुंबाने जपलेल्या या कौटुंबिक जिव्हाळ्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.

अजितदादांनी दिलेला शेवटचा शब्द.... सुनेत्रा वहिनींनी पाळला, कट्टर आमदाराची इच्छा पूर्ण
ajit pawar
| Updated on: Feb 20, 2026 | 12:31 PM

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूने अवघ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांची झपाटून काम करण्याची शैली आणि दिलेला शब्द पाळणारा नेता अशी ओळख होती. राजकारणात शब्दाला जागणारा नेता म्हणून अजित पवार यांची सर्वत्र ख्याती होती. याच प्रचितीचा प्रत्यय आज चिपळूणच्या सावर्डे येथे पाहायला मिळाला. चिपळूण-संगमेश्वरचे लोकप्रिय आमदार शेखर निकम यांच्या कन्येच्या विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मी येणार असा शब्द अजित पवार यांनी दिला होता. मात्र दुर्देवाने त्यापूर्वीच अजित पवारांवर काळाने घाला घातला. मात्र अजित पवारांनी दिलेला हा शब्द त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पाळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात या लग्नाची चर्चा रंगली होती. याचे मुख्य कारण म्हणजे या सोहळ्यासाठी स्वतः अजित पवार उपस्थित राहणार होते. विशेष बाब म्हणजे अजित दादांना इतर कामांमुळे वेळेचे गणित जुळवणे कठीण होते, म्हणून आमदार शेखर निकम यांनी दादांनी सुचवलेला मुहूर्तच लग्नासाठी निश्चित केला होता. यानंतर अजित दादांनी या लग्नाला उपस्थित राहण्याचा शब्द दिला होता. त्यांच्या या शब्दाखातर संपूर्ण लग्न सोहळ्याचे नियोजन आखण्यात आले होते.

दिलेला शब्द खाली पडू द्यायचा नाही

अजित पवार आणि निकम कुटुंबातील ऋणानुबंध हे केवळ राजकीय सोयीपुरते मर्यादित नाहीत. निकम कुटुंब हे अजितदादांचे अत्यंत कट्टर समर्थक मानले जातात. खंडोबाची भक्ती, गाढ विश्वास आणि एकमेकांप्रती असलेला आदर यामुळे ही दोन्ही कुटुंबे जोडली गेली आहेत. दादा येणार हा शब्द निकम यांच्यासाठी केवळ आश्वासन नव्हते, तर तो एक भावनिक आधार होता. मात्र त्यापूर्वीच २८ जानेवारीला अजित पवारांचे एका विमान अपघातात निधन झाले. यामुळे निकम कुटुंबातही शोकाकुल वातावरण होते.

अजित दादांनी लग्नाला यावे, यासाठी त्यांनीच सुचवलेला मुहूर्त ठरवणे आणि अचानक अजित पवारांचे दुर्देवी निधन होणे, हा धक्का पचवणे निकम कुटुंबासाठी फारच कठीण होते. मात्र, दिलेला शब्द खाली पडू द्यायचा नाही या तत्त्वावर पवारांचे संपूर्ण कुटुंब चालते, याचा अनुभव निकम यांच्या कुटुंबाला आला. आज होणाऱ्या या लग्नासाठी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहे. सुनेत्रा वहिनींनी विवाहस्थळी येत असल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे.

कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन घडले

या शाही विवाह सोहळ्यासाठी सावर्डे येथे भव्य मंडप उभारण्यात आला होता. याप्रसंगी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचेच नव्हे, तर सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील हजारो नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. आता या विवाहसोहळ्यासाठी त्यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी या प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहे. त्यामुळे निकम कुटुंब आणि पवार कुटुंब यांच्यातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे दर्शन उभ्या महाराष्ट्राला घडले.