दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर.., अजितदादांची मोठी मागणी, पेच वाढला, शरद पवार काय निर्णय घेणार?

मोठी बातमी समोर येत आहे, आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची युती होणार आहे, मात्र नव्या मागणीमुळे पेच वाढण्याची शक्यता आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर.., अजितदादांची मोठी मागणी, पेच वाढला, शरद पवार काय निर्णय घेणार?
अजित पवार, शरद पवार
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Dec 26, 2025 | 3:42 PM

महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, सर्वच राजकीय पक्षांसाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची आहे, त्यामुळे आता युती आणि आघाड्यांची समीकरण जुळवली जात आहेत. महायुतीमध्ये अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटानं युती केली आहे, तर काही ठिकाणी या युतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट देखील सहभागी होणार आहे. मात्र ज्या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाची भाजप आणि शिवसेना शिंदे गटासोबत युती होणार नाही, तिथे राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत युती करणार आहे. पुणे, आणि पिंपरी चिंचवड या दोन प्रमुख महापालिकेसह इतर काही ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांची युती होण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युतीसंदर्भातील हालचालींना आता वेग आला आहे. पुण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची युती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी अंकुश काकडे  आणि आमदार बापू पठारे यांनी अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये  युती सदंर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या तर महानगरपालिका निवडणूक घड्याळाच्या चिन्हावरती लढवावी यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आग्रही आहेत.

दरम्यान अजित पवार यांच्या या मागणीमुळे आता नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट ही मागणी मान्य करणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळालं होतं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं. त्यामुळे आता ही निवडणूक शरद पवार गट घड्याळ या चिन्हावर लढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.